भारीच! मराठमोळ्या अभिनेत्याने होस्ट केला अनंत-राधिकाचा ‘शुभ आशीर्वाद’ सोहळा
16-Jul-2024
Total Views | 49
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. या नव वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे मंडळी आले होते. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिकाच्या शुभ आर्शिवाद सोहळ्यात एका मराठमोळ्या कलाकाराला मोठी जबाबदारी दिली होती; ती म्हणजे हा सोहळा होस्ट करण्याची संधी अभिनेता शरद केळकर याला दिली होती.
अनंत-राधिकाच्या ‘शुभ आशीर्वाद’' सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री, राज्यपाल रमेश बैस, द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अशा अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय, मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीलही कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आणि या मोठ्या-मोठ्या मान्यवरांसमोर संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबादारी मराठमोळ्या शरद केळकरने लिलया पार पाडली. या 'शुभ आशीर्वाद'' या समारंभातील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये शरद केळकर आपल्या भारदस्त आवाजात होस्ट करताना दिसत आहे.
शरद केळकर याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आजवर शरद केळकरने मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. व्हॉइस ओव्हर क्षेत्रातही आपली मोहोर उमटवली आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासला हिंदीत आवाज शरद केळकरने दिला होता. याबरोबरच मार्वेलच्या 'गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी’ आणि ‘मॅडमॅक्स फ्यूरी’सारख्या हॉलिवूडपटांच्या हिंदी डबिंगमध्येही शरद केळकरचाच आवाज होता.