मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै २०२४ रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यापुर्वी गेले काही दिवस प्री-वेडिंग कार्यक्रम देखील थाटामाटात साजरे करण्यात आले होते. अशातच नुकतीच अँटिलियावर शिव शक्ती पुजा करण्यात आली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बहुचर्चित अशा या शाही लग्नसोहळ्याकडे देशाचं नव्हे तर संपुर्ण जगाचं लक्ष लागले आहे. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी पाहुणे मंडळी मुंबईत दाखल होत असून यात हॉलीवूड, बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकीय नेतेमंडळी मुंबईत अनंत-राधिकाला आर्शिवाद देण्यासाठी पोहोचले आहेत.
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधी शिव शक्ती पूजा १० जुलैला अँटिलिया बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. ज्याला अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. या पूजेत संपूर्ण अंबानी कुटुंबासहित पाहुणे मंडळी शिव शक्ती पूजा करताना तल्लीन झाले असून सदस्य होम, आरती, शिवलिंगावर अभिषेक करताना दिसत आहेत.
दरम्यान, आज विवाह झाल्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशिर्वाद समारंभ होणार असून मोजके पाहुणेच यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यात कलाकार, राजकीय नेते, परदेशी पाहूणे येणार आहेत.