लोकसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे देशातील विकास आणि सकारात्मक विचारांचा विजयः अभाविप
05-Jun-2024
Total Views | 28
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election ABVP) निकाल लागला असून रालोआने इंडी आघाडीवर मोठा विजय मिळवून पुन्हा सत्ता प्राप्त केली. लोकसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे देशातील विकास आणि सकारात्मक विचारांचा विजय असल्याचे म्हणत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुभेच्छा दिल्या आहेत. जनादेशामुळे देशाची लोकशाही अधिक सुदृढ आणि समृद्ध झाली असे कौतुकोद्गार काढत अभाविपने भारतीय जनतेचे कौतुक केले आहे.
अभाविपने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, देशाची ही लोकसभा निवडणूक विकास, समृद्धी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याच्या विचाराला पोषक ठरली आणि ज्यांनी जात, प्रदेश, पंथाच्या आधारे देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यांना प्रत्युत्तर मिळाले. भारतीय केंद्रीत विचारांना समर्पित नेतृत्वाचा पुन्हा विजय देशाला सकारात्मक दिशा देईल. १८व्या लोकसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळाल्याने देशाच्या शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत नवीन केंद्र सरकारने देशाची उन्नती, समृद्धी आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याची आशा व्यक्त केली आहे.