मला सरकारमधून मोकळं करावं, मला फक्त पक्षाचं काम करायचंय : देवेंद्र फडणवीस

    05-Jun-2024
Total Views | 222
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis BJP) लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर बुधवार, ५ जून रोजी पत्रकार परिषद घेतली. "महाराष्ट्रात भाजपला जो पराभव सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो आहे. मला सरकारमधून मोकळं करावं. मला फक्त पक्षाचं काम करायचं आहे," अशी विनंती त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे यावेळी केली. 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी जशी आमची लढाई ही मविआच्या तीन पक्षांशी होती तशीच काही नरेटिव्हशीदेखील आमची लढाई होती. विरोधकांनी तयार केलेला संविधान बदलण्याचा नरेटिव्ह ज्याप्रमाणात थांबवता यायला हवा होता त्याप्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही. पण जनेतेने दिलेला जनादेश आम्ही शिरसावंद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."
 
हे वाचलंत का? -  "राऊतांनी आदित्य ठाकरेंचा राजीनामा मागावा!"
 
"राज्यात महायूतीच्या जागा कमी आल्या आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपमध्ये या निवडणूकीचं नेतृत्व मी करत होतो. त्यामुळे या निवडणूकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी कुठेतरी कमी पडलो आहे, हे मान्य करतो. ती कमतरता भरून काढण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात भाजपला जो पराभव सहन करावा लागला त्याची सगळी जबाबदारी मी स्विकारतो आहे. मला विधानसभेकरिता पूर्ण वेळ उतरायचं आहे. त्यामुळे पक्षाने मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. जेणेकरून ज्या कमतरता राहीलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येणार आहे. बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल. मी त्यांच्यासोबत राहणार आहे. यासंदर्भात लवकरच मी पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार असून ते सांगतील त्यापद्धतीने पुढची कारवाई करेन," अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
 
तसेच पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशिर्वाद जनतेने दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मतदान मिळालं तर आम्हाला ४३.६० टक्के मतदान मिळालं आहे. महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मतं मिळाली तर महायूतीला २ कोटी ४८ लाख मतं मिळाली आहे. म्हणजेच त्यांना आमच्यापेक्षा फक्त २ लाख मत जास्त मिळाली आहेत," असेही त्यांनी सांगितले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121