विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात! तालिका अध्यक्ष आणि सभापतींची नियुक्ती
27-Jun-2024
Total Views | 61
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच गुरुवार, दि. २७ जूनपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना सुधारणा अध्यादेश २०२४', 'महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश २०२४' ही दोन विधेयके विधानसभा आणि विधान परिषदेच्या पटलावर ठेवण्यात आली. तसेच सन २०२३-२४ चा आर्थिक पहाणी अहवाल दोन्ही सभागृहासमोर ठेवण्यात आला. शोक प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, अमिन पटेल, डॉ. किरण लहामटे, समाधान आवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभापती तालिकेवरील सदस्यांची नावे जाहीर केली. प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, मनीषा कायंदे यांना सभापती तालिकेवर नामनिर्देशित केल्याचे जाहीर करण्यात आले.