"उद्धवजींना एखाद्या खुर्द वस्तीतल्या बुद्रुक सोसायटीचं..."; चित्राताईंचा टोला
27-Jun-2024
Total Views | 97
मुंबई : उद्धवजींना एखाद्या खुर्द वस्तीतल्या बुद्रुक सोसायटीचं चेअरमनपदही त्यांना मिळायची सुतराम शक्यता नाही, असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना लगावला आहे. संजय राऊतांनी मविआत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असल्याचं सूचक वक्तव्य केलं होतं. यावर आता चित्राताईंनी त्यांच्यावर निशाणा साधला.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "आपण उद्धवजींना महाभकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याची अपेक्षा व्यक्त करणे म्हणजे फाजील आत्मविश्वासाचा कळस झाला. कारण मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धवजींच्या नावावर जे विक्रम जमा झालेत, त्यांच्या बळावर एखाद्या खुर्द वस्तीतल्या बुद्रुक सोसायटीचं चेअरमनपदही त्यांना मिळायची सुतराम शक्यता नाही," असा टोला त्यांनी लगावला.
त्या पुढे म्हणाल्या की, " मुख्यमंत्री असूनही मंत्रालयाची पायरी न चढलेला, अवकाळीने गांजलेल्या शेतकऱ्याच्या बांधावरही न फिरकलेला, चक्रीवादळाने भिरकावून दिलेल्या कोकणी माणसाला साधा आधाराचा हातही न दिलेला अशा अनेक विक्रमांची माळ ते गळ्यात मिरवत आहेत. याची जाणीव महाभकास आघाडीतल्या तथाकथित जाणत्यांना आहे. त्यामुळे तुमच्यावर मनातले मांडे मनातच खाण्याची वेळ येईल," असेही त्या म्हणाल्या.