केजरीवालांनी बांधला तर भगवंत मान यांनी भाड्याने घेतला शीशमहल; महिन्यातील ८ दिवस राहण्यासाठी कोट्यावधीचा खर्च?
27-Jun-2024
Total Views | 27
चंदिगड : राजधानी चंदिगड व्यतिरिक्त पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आता जालंधरमध्ये राहण्यासाठी एक आलिशान बंगला भाड्याने घेतला आहे. बंगला भाड्याने घेण्याचा उद्देश या भागातील लोकांची सेवा करणे हाच असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे. याच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीमुळे जालंधरमध्ये भाड्याने घर घेण्याचे बोलले होते.
पंजाब मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना आणि केंद्र सरकारकडे दररोज मदतीची याचना करत असताना आलिशान घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी X (पूर्वी ट्विटर) वर बंगला भाड्याने घेण्याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “अलीकडेच मी जालंधरमध्ये भाड्याने घर घेत असल्याचे सांगितले होते. आज मी माझ्या कुटुंबासह जालंधर येथील एका घरी आलो आहे. दोआब भागातील लोकांना आता चंदीगडला जावे लागणार नाही, त्यांच्या समस्या येथून सुटतील. लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि सरकारशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.
यासोबतच भगवंत मान यांनी काही फोटोही शेअर केले आहेत ज्यात ते त्यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर आणि मुलगी नियामत कौरसोबत दिसत होते. आठवड्याला दोन दिवस ते या घरात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लुधियानाच्या फगवाडा रोडवर हा आलिशान बंगला आहे आणि त्यात पाच बेडरूम आहेत. हा बंगला अंदाजे ३२,००० स्क्वेअर फूट मध्ये बांधण्यात आलेला आहे. हा बंगला जालंधरच्या डॉ. रणबीर सिंह यांचा आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या बंगल्याला महिन्याचे आठ दिवस राहण्यासाठी घेण्याचा निर्णय घेतला असताना, राज्याची आर्थिक स्थिती सुधारत नाहीये. पंजाबचे कर्ज सतत वाढत आहे. आप-शासित पंजाबचे कर्ज २०२४-२५ मध्ये ३.७४ लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आली तेव्हा हे कर्ज २.८२ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आपच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यात सुमारे ९२,००० कोटींची वाढ झाल्याचे दिसते.
पंजाबची आर्थिक स्थिती पाहता भगवंत मान स्वतः या आलिशान बंगल्याचे भाडे देणार की आर्थिक संकटात अडकलेले पंजाब सरकार त्याचा खर्च उचलणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याशिवाय हा बंगला भाड्याने देण्यामागची वेळ आणि खऱ्या उद्देशावरही अटकळ बांधली जात आहे. मान यांनी हा बंगला भाड्याने घेतला आहे, तिथे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. मान यांनी जनतेची सेवा म्हणून बंगला भाड्याने घेण्याचे कारण दिले असले तरी आधी पोटनिवडणुकीत प्रचार करण्यासाठी वापर केला जाईल, अशी टीका विरोधकांनी केला आहे.