जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : मंत्री मंगल प्रभात लोढा
18-Jun-2024
Total Views | 43
मुंबई : जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहे. चार दिवसांपूर्वी गुजरातमधील पावागढ येथे काही समाजकंटकांनी जैन तिर्थंकरांच्या मूर्तींची विटंबना केली. याविरोधात जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या बैठकीत दक्षिण मुंबई जैन संघाच्या सदस्यांसोबत मंत्री लोढांनी सहभाग घेतला.
सदर घटना संपूर्ण जैन समाजाला त्रस्त करणारी असून, त्या विरोधात दोषींना शिक्षा व्हायलाच हवी. तसेच जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे मंत्री लोढा यांनी या बैठकीत सांगितले. पावागढ तीर्थ येथे संप्रती महाराजांच्या काळातील मूर्तींची तोडफोड करून त्या कचऱ्यात फेकण्यात आल्या आहेत. या कृत्यामुळे संपूर्ण भारतातील जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली गेली आहे. पोलीसांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी सूरत कलेक्टर ऑफिसबाहेर जैन समाजातील हजारो नागरिकांचे शांतिप्रय पद्धतीने आंदोलन सुरु आहे.