ऊन-पाऊस

    24-May-2024
Total Views |
pune city climate prediction
 

पुणे महानगरात आजकाल हवामानाचे रंग दिवसेंदिवस अगदी सरडा रंग बदलतो, तसे बदलत आहेत. येथील वेधशाळा कधी पावसाचा तर कधी तापमानवाढीचा अंदाज देऊ लागल्याने टीव्हीवरील बातम्यांतून जसे राजकीय नेते आपले वक्तव्य बदलत असतात किंवा आजकाल हवे तसे त्यांचे वक्तव्य बदलवून ‘नॅरेटिव्ह’ सेट केले जात असतात, तशीच संभ्रमनिर्मिती या वातावरणाने केलेली दिसते. मे महिन्याच्या मध्यंतरी मुसळधार पावसाचा अनुभव घेतलेल्या पुणेकरांना उन्हाचा तडाखादेखील अनुभवायला मिळाला. आता तर रात्रीच्या उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत. बरं, या उन्हाळ्यामुळे रस्त्यांवरचा शुकशुकाट वगैरेची संधी दिली नाही म्हणून काहींनी उन्हालाच दोष दिला आहे, तर ऐन भलत्यावेळी आलेल्या पावसाने नियोजनाचा बट्ट्याबोळ केला म्हणून काहींनी पावसावर खापर फोडणे सुरू केले आहे. मुळातच पुणे हे उन्हाळ्यात इतकं तापणारं शहर नव्हतं. मात्र, आता नुसता ताप होऊन बसला आहे. चाळीशीपार पारा जाणं हे जुन्या पुणेकरांना कधी अनुभवता आलंच नाही. पण, आता तर आठवड्यातून चारपाच दिवस तापमानाने चाळिशी गाठल्याचे आकडे हवामान खाते जारी करीत असते. यामागील कारणांचा शोध हवामान खाते कधीच घेत बसत नाही. मात्र, जागतिक तापनमानवाढ, पुणे सभोवतालची अमाप वृक्षतोड, डोंगर पोखरणे आणि औद्योगिकीकरण ही कारणे देऊन आपले समाधान करून घेत असतात. काही ठिकाणी तर आता महानगराच्या आसपास कचर्‍याचे डोंगरदेखील उभे राहत आहेत. दिवसागणिक वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. त्यावर उपाय सांगणारे खूपच कमी आणि विरळ आहेत, त्यामुळे ते अमलात आणणार्‍यांची संख्या तर नगण्यच म्हणावी लागेल, ज्यावेळी उपायांची अंमलबजावणी प्रभावी होईल, तेव्हाच या वैभव असलेल्या महानगरातील तापमानाचा पारा घसरलेला दिसेल किंवा या तापमानवाढीच्या दुष्परिणामांची झळ कदाचित पोहोचणार नाही. त्यासाठी कदाचित आगामी पिढी अनुभव घेऊ शकेल, असा हवामान खात्यासारखा अंदाज बांधायला हरकत नाही. आज मात्र हा ऊन-पावसाचा खेळखंडोबा त्रासदायक ठरतोय, हे मान्य करावेच लागेल. यातून सुटका ज्याची त्यालाच करून घ्यायची आहे. कारण, व्यवस्था हतबल आहे.
 
घात-अपघात

जसे-जसे राज्यात नागरीकरण वाढत चालले आहे, तसेतसे नवे प्रश्न समस्यादेखील निर्माण होत चालल्या आहेत. त्या समस्यांवर उपाय असले तरी त्याचा उपयोग करून न घेता, निव्वळ आपल्या गतिमान जीवनाला पुढे नेण्याच्या स्पर्धेत जो-तो गुंतलेला. नागरीकरण ही आता काळाची गरज होत असल्याने त्यादृष्टीनेच पावलं टाकली पाहिजेत. मात्र, असे करताना कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत, ही काळजीदेखील घ्यायला हवी. पुणे महानगराचादेखील असाच झपाट्याने विस्तार गेल्या दशकात झाल्याचे बघायला मिळाले. आता आगामी दशकात तर विकासाची कामे इतकी होणार आहेत की, हे नागरीकरण चहुबाजूंनी झालेले दिसणार आहे. मात्र, जी काळजी हा विस्तार होताना घेतली गेली पाहिजे ती घेतली जात नसल्याचे दुर्दैवाने नुकत्याच झालेल्या एका भयंकर अपघाताने दाखवून दिले. तसेही या महानगरात अलीकडील काळात रोज गुन्हेगारीदेखील वाढत असल्याने ती हाताळण्यासाठी पुरेशी सक्षम यंत्रणा आहे की नाही, ही शंका घ्यायला वाव आहे. केवळ या समस्यांचे मूळ प्रशासन आहे असे नव्हे, तर झपाट्याने वाढणार्‍या नागरीकरणात जे नागरिक सहभागी होत आहेत, ते देखील दुर्लक्ष करीत असतात हे मान्य करावे लागेल, मग समस्या उभी राहिली की यंत्रणेकडे सोयीस्कररित्या बोट दाखवायचे हे नित्याचे झाले आहे. असे असले तरी विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जात असले, तरी ते अपुरे पडताहेत आणि भविष्यातही ते प्रभावी ठरतीलच याची हमी आता देणे घाईचे ठरणार आहे, मात्र या सगळ्या गतिमान प्रक्रियेत जे दिवसागणिक घात-अपघात होत आहेत आणि त्यातून जे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत, त्यावर उत्तर शोधण्याची नितांत गरज आहे.कल्याणीनगर अपघात प्रकरणाने विकासाकडे जाणार्‍या पुण्याच्या अनेक सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील समस्यांना वाचा फोडली आहे, हे सर्व टाळायचे असेल तर विकासाच्या सोबत वाढत चाललेला स्वैराचार थांबविला पाहिजे आणि ती जबाबदारी समाजाची आहे, अन्यथा असे घात-अपघात भविष्यात कुटुंबे उद्ध्वस्त करतानाच सामाजिक समतोलदेखील बिघडवत राहतील आणि भलत्याच समस्या निर्माण होत राहतील.

अतुल  तांदळीकर 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121