ब्रेकिंग न्यूज! काँग्रेस प्रवक्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
09-Apr-2024
Total Views | 154
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी पुढे आली आहे. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. निवडणूकीच्या तोंडावर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, "सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे असे सर्व कार्यकर्ते ओरडून सांगत असतानाही या जागेसाठी काँग्रेसला आपल्या टाचा घासाव्या लागत आहेत. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने या जागेवर उमेदवार घोषित करुन टाकले. यावरून काँग्रेसची परिस्थिती काय आहे, हे दिसून येत असून हीच परिस्थिती भिंवडीमध्येसुद्धा आहे. भिवंडी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असतानाही शरद पवार गटाने ही जागा घोषित करुन टाकली आहे. जणूकाही काँग्रेसची किमंत संपलेली आहे, हेच यातून दिसून येतं."
"त्यामुळे या सगळ्याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर होणं साहाजिक आहे. हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसजन दु:खी आणि दबावाखाली आहेत. आपलं पुढचं भविष्य काय हे त्यांना कळत नाहीये. त्यांना हे भविष्य दाखवण्यासाठी मी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजयाची गुढी उभारत सामान्य माणसाचा मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसाचे मुख्यमंत्री आहेत. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या दोन वर्षात कामगिरी केली ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात कुणीही केलेली नाही. ही गोष्ट विरोधकांनादेखील मान्य करावं लागेल. मला त्यांच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या उद्धारासाठी मी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचं ठरवलं आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील हजारों कार्यकर्तेदेखील माझ्या संपर्कात आहेत," असेही ते म्हणाले.