
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी घसरण झाली आहे. सेन्सेक्स व निफ्टी पुन्हा एकदा घसरला आहे. जागतिक पातळीवरील दबाव,अमेरिकेतील वाढलेला महागाई दर तसेच इस्त्राईल व इराण यांच्यातील धुमश्चक्रीमुळे पुन्हा क्रूड तेलाच्या आयात निर्यातीत संकट निर्माण झाले व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉलर व सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आज आशियाई बाजारात मंदी दिसत आहे.
सकाळी ११ वाजता सेन्सेक्स ५२८.१४ (०.७१ %) ७३६१६ पातळीवर घसरला आहे. निफ्टी ५० निर्देशांकात १४०.०५ अंशाने घसरण होत २२३७९.३५ पातळीवर निफ्टी घसरला आहे. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही मोठी घट झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ५६०.६२ अंशाने घसरत ५४३२३.७५ पातळीवर घसरला व निफ्टी बँक निर्देशांकात ५००. ५५ अंशाने घसरण होत ४८०६४.०० पातळीवर घसरण झाली आहे.
आज बीएसईत नेसले, रिलायन्स, जेएसडब्लू स्टील या समभागात (Shares) मध्ये वाढ झाली आहे. टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, एचयुएल, विप्रो, आयसीआयसीआय बँक, लार्सन, एचसीएलटेक, एसबीआय, सनफार्मा या समभागात घट झाली आहे.
एनएसईत ओएनजीसी,हिंदाल्को,नेसले इंडिया,रिलायन्स,बजाज ऑटो,जेएसडब्लू स्टील या समभागात वाढ झाली आहे.टाटा कनज्यूमर,टेकएम,अदानी एंटरप्राईज, टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स,आयसीआयसीआय बँक,विप्रो,एचसीएलटेक,एलटीएम या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.ओएनजीसी या समभागात एनएसईत ४.७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत टाटा कनज्यूमर समभागात २.९ टक्क्यांनी घट झाली आहे.
मेटल व तेल गॅस समभागात आज वाढ झाली असली तरी इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान मिडिया समभागात झाले.