उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर १३ हजार मदरसे बंद होणार ?
07-Mar-2024
Total Views | 36
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्यातील १३ हजार बेकायदेशीर मदरसे बंद करण्याची शिफारस केल्याचे समजते.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील बेकायदेशीर मदरशांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने आपला अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात १३ हजार बेकायदा मदरसे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील बहुतांश मदरसे नेपाळ सीमेजवळ चालत असल्याचे आढळून आले. हे बेकायदेशीर मदरसे गेल्या दोन दशकांतच बांधण्यात आले असून ते बांधण्यासाठीचा पैसा आखाती देशांतून आल्याचेही उघड झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या १३ हजार मदरशांवर कारवाई करण्यास सांगितले आहे, त्यापैकी काही बहराइच, श्रावस्ती, महाराजगंज अशा ७ जिल्ह्यांतील आहेत. प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यात त्यांची संख्या 500 हून अधिक आहे, परंतु जेव्हा एसआयटीने त्यांच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशेब विचारला तेव्हा त्यांच्याकडे उत्तर नव्हते. हे मदरसे सुनियोजित कटाचा भाग म्हणून बांधले गेले नसावेत आणि दहशतवादी फंडिंगसाठी जमा केलेला पैसा हवालाद्वारे पाठवला गेला नसावा, असा संशय एसआयटीला आहे.