कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु असताना आता कोल्हापूरची जागा शरदचंद्र पवार गटाकडे जाणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्याची माहिती पुढे आल्याने या चर्चांना उधाण आले.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणुक लढवावी अशी ऑफर दिली होती. त्यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढायचं हे त्यांनी ठरवावं, असे वक्तव्य केले. त्यामुळे याबाबत मविआमध्ये रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे, शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंच्या मुलाच्या लग्नात संभाजीराजे आणि शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता शाहू महाराजांच्या उमेदवारीच्या स्पर्धेत शरदचंद्र पवार गटानेही एन्ट्री घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता शाहू महाराज कोल्हापूरात कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.