अहमदनगर नव्हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणा!, कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय
13-Mar-2024
Total Views |
मुंबई : अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. दि. १३ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली. पुणे येथील वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींनी सकारात्मक ठराव केला होता. पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली. त्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ रोजी शासनाला तसा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
दरम्यान, मुंबईतील काही रेल्वे स्थानकांच्या नामांतरणाविषयीही केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार, शहरातील १० रेल्वे स्थानकांचे नामांतरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वेस्टर्न रेल्वेमधील मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, चर्चगेट तर करी रोड, सँडहर्स्ट रोड, कॉटन ग्रीन इ. स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.