नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) विरोधात डाव्या विचारसरणी समर्थकांकडून आगपाखड करण्यात येत आहे. दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात सीएए कायद्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, विद्यापीठ कुलगुरूंनी आंदोलनास परवानगी दिली जाणार नाही असे सांगितले आहे. त्याचबरोबर, कॅम्पसमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात केले आहेत. मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन (एमएसएफ) आणि काँग्रेसशी संलग्न नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) यांनी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसह सीएए कायदा निषेधाचे नेतृत्व केले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणजे २०१९ मध्ये संसदेने कायदा मंजूर केला तेव्हापासून जामिया विद्यापीठात निषेधात सूर उमटला होता. त्यानंतर आता दि. ११ मार्च रोजी कायद्याबाबत अधिसूचना जारी झाल्यानंतर विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विद्यापीठ कुलगुरू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कॅम्पसमध्ये कोणतेही आंदोलन होऊ दिले जाणार नाही. याकरिता कॅम्पसमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत. विद्यापीठाचे कार्यवाहक प्र-कुलगुरू एकबाल हुसेन यांनी एका निवेदनात सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसमधील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
ते पुढे म्हणाले की, प्रशासन कॅम्पसजवळ किंवा परिसरात कोणत्याही आंदोलनास परवानगी देणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “कॅम्पसमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये यासाठी आम्ही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. कॅम्पसजवळील विद्यार्थी किंवा बाहेरील लोकांना (सीएए) कायदा विरोधात कोणतेही निषेध कृत्य करण्यास मज्जाव करण्यात येईल.”, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.