मुंबई : “मराठी प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर न पाहता येण्यासारखा आशय जर असेल तरच ते चित्रपट किंवा नाट्यगृहात जाऊन गर्दी करतील. त्यामुळे जुन्या संकल्पनांची कात टाकून नव्या कल्पना रुजू करणे अत्यंत महत्वाचे आहे”, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, लेखक यांना महत्वाचा सल्ला दिला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मराटी रसिक प्रेक्षकांना सोयीसाठी ‘तिकीटालय’ हे ॲप ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश कोठारे देखील उपस्थित होते. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात हा कार्यक्रम संपन्न झाला.
लोकांना विषय आणि सादरीकरणातला एकसारखेपणा नको
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, दिग्दर्शक-लेखक-अभिनेते प्रशांत दामले यांनी तिकीटालय हे ॲप सुरु करुन एक महत्वाचं काम केलं असून त्यासाठी त्यांचे अभिनंदन. प्रशांत दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १५ कोटी मराठी लोकं महाराष्ट्रात आहेत, अगदी एखाद्या युरोपियन देशाच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मराठी लोकं केवळ महाराष्ट्रात आहेत. मात्र, असे असूनही काही ठराविक मराठी नाटकं, चित्रपट वगळता इतक कलाकृती पाहायला प्रेक्षक जात नाहीत अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे याचे कारण शोधून आपण सगळ्याच बाजूंनी कात टाकणं महत्वाचं आहे. जे विषय किंवा आशय प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर पाहायला मिळतात त्या कलाकृती तिकीट काढून कुणीही पाहायला जाणार नाही. आज हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपट प्रेक्षकांना पसंतीस येत नाही आहेत. कारण लोकांना विषय आणि सादरीकरणातला एकसारखेपणा नको झाला आहे. आणि जे चित्रपट प्रेक्षकांमुळे चालत आहेत त्याचे कारण त्या कथा प्रेक्षकांना अन्य कुठे पाहायला मिळत नाही”. पुढे ते असं देखील म्हणाले की, “मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीत जुन्या संकल्पनांची कात टाकत नव्या कल्पना घेऊन आल्या पाहिजेत. मराठी भाषा अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी माझ्याकडून जो हातभार लागेल तो मी करत राहीन”.
काय आहे तिकीटालय ॲप?
मराठी रसिक प्रेक्षकांना इतर तिकीट बुकिंग ॲपच्या जंजाळात मराठी नाटक, चित्रपट, संगीत, नृत्य आणि इतर कलात्मक कार्यक्रम कुठे असतात याची माहिती बऱ्याचदा मिळत नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या अडचणी दुर करण्यासाठी तिकीटालय हे ॲप सुरु करण्यात आले असून १५ मार्च २०२४ पासून ते प्ले स्टोरवर उपलब्ध होणार आहे. यात केवळ मराठी मनोरंजन कार्यक्रमांची माहिती असणार असून यातूनच प्रेक्षक आपले तिकीट बुकिंग करु शकतात.