मुंबई : मनी लॉंड्रींग प्रकरणात अडकलेला बिग बॉस फेम अब्दु रोजिक याची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. नेमकी तो आरोपी आहे की साक्षीदार याबबात त्याच्या वकिलांनी खुलासा केला आहे. अब्दु याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी बोलावण्यात आल्याचे त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले असल्याचे वृत्त 'आज तक'ने दिले आहे. मूळचा ताजकिस्तानचा असलेला गायक 'बिग बॉस'फेम अब्दु रोजिक आणि मराठमोळा अभिनेता आणि बिग बॉस फेम शिव ठाकरे या दोघांना काही दिवसांपुर्वी ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते.
काय आहे संपुर्ण प्रकरण?
मराठी आणि हिंदी 'बिग बॉस'मधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या शिव ठाकरे याला मनी लॉंन्ड्रिंग प्रकरणात ईडी कडून समन्स बजावण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर प्रकरणात अली असगर शिराझी याला २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी शिव ठाकरेसह हिंदी बिग बॉस १६ मधील अब्दु रोजिक याला देखील समन्स पाठण्यात आले.
शिव ठाकरे याने हिंदीतील 'बिग बॉस १६' हा शो संपल्यानंतर 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' या नावाने एक व्यवसाय सुरू केला होता.अली असगर शिराझी याच्या हसलर हॉस्पिटॅलिटी या कंपनीकडून मोठी गुंतवणूक करण्यात आली होती.विशेष म्हणजे याच कंपनीसोबत अब्दु रोझिकने मुंबईत स्वतःचे 'बुर्गिर' रेस्टॉरंटही सुरु केले होते,मात्र, काही महिन्यांतच अली असगर शिराझीचे ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर शिव ठाकरेनं हा करार रद्द देखील केल्याची माहिती मिळत आहे.
शिव ठाकरे याने खुलासा केला की, त्यांनी २०२२-२३ मध्ये हसलर हॉस्पिटॅलिटीचे संचालक कृणाल ओझा यांची भेट घेतली होती.कृणालने त्याला ठाकरे चहा आणि स्नॅक्ससाठी भागीदारीचा करार देऊ केला होता. या करारानुसार हसलर हॉस्पिटॅलिटीने ठाकरे चहा आणि स्नॅक्समध्ये मोठी रक्कम गुंतवली होती. शिव ठाकरेने ईडीला सांगितले की,'जेव्हा त्यांनी त्यांच्या स्टार्टअपसाठी आर्थिक मदत मागितली तेव्हा ते शिराझी यांना भेटले नव्हते किंवा त्यांच्याबद्दल त्यांना कोणतीही अधिक माहितीही नव्हती".
कोण आहे अली असगर शिराझी?
एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी अली असगर शिराझी याला ताब्यात घेतले होते. शिराझी दुबईला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली होती.
कोण आहे शिव ठाकरे?
बऱ्याच रिअॅलिटी शो मधून पुढे आलेल्या शिव ठाकरे याचा प्रवास ‘रोडीज’पासून सुरू झाला. पुढे तो ‘बिग बॉस मराठी’, ‘बिग बॉस हिंदी’, ‘खतरोंके खिलाडी’ आणि आता ‘झलक दिखला जा’या शो मध्ये देखील दिसला होता.