दि. १४ फेब्रुवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये ’बीएपीएस’च्या स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन झाले. ही तिथे राहणार्या भारतीय समाजासाठी आनंदाची गोष्ट आहेच; पण भारतातील आणि जगभर पसरलेल्या हिंदू समाजासाठी अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे. अबुधाबीत तीन दशकांहून अधिक काळ वास्तव्य केलेल्या प्रशांत कुलकर्णी यांनी या ऐतिहासिक क्षणाचे उलगडलेले महत्त्व...
असे नाही की, मुस्लीम देशात प्रथमच मंदिर उभारले जातेय. युएईच्या बाजूला लागूनच असलेल्या ओमान या देशात मस्कतमध्ये गेले तीन पिढ्या वास्तव असलेल्या खिमजी रामदास या भारतीय उद्योगपतीने बांधलेली दोन सुंदर मंदिरे आहेत. तसेच दस्तरखुद्द दुबईमध्ये ५०-६० वर्षांपूर्वी समुद्राकाठच्या एका छोटेखानी इमारतीत तेव्हाच्या दुबईच्या शेख राशीदने (सध्याचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल माकतुम यांचे वडील) मंदिर बांधायला परवानगी दिली होती. या मंदिराची इमारत अगदी जीर्ण अवस्थेत आल्यावर, गेल्या वर्षी जेबल अली येथे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे.
आजघडीला युएईमध्ये मुख्यतः दुबई, अबुधाबी, शारजा या एमिरेट्समध्ये पाच ते आठ हजार मराठी घराघरातून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गणपतीच्या मूर्ती भारतीय सुपरमार्केटमध्ये अगदी सहजपणे मिळतात. काळाचा महिमा बघा, ७०-८०च्या दशकात भारतातून येणार्या वृत्तपत्रात ’लोकप्रभा’, ‘चित्रलेखा’ यांसारख्या साप्ताहिकांचे गणपती विशेषांक वगैरे जेव्हा यायचे, तेव्हा मुखपृष्ठावर असलेल्या देवांच्या फोटोवर काळ्या मार्करने रेघोट्या ओढून, त्यांचे चेहरे काळे केलेले असायचे, ते बघून जीवाची कालवा कालव व्हायची. पण, विसावे शतक ओलांडताना, एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जागतिक आर्थिक बदलाची चाहूल युएईच्या शिक्षित नव्या पिढीलाही झाली.
युएईचे भारताबरोबरचे संबंध पहिल्यापासून चांगले होते. जवळपास ३५ लाख भारतीय तिथे नोकरी-व्यवसायानिमित्त राहतात. तिथे हिंदू-मुस्लीम हा भेदभाव कुठे जाणवत नाही. आपल्या घराच्या चार भिंतीत तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता. पण, कुठलाही धर्म असो रस्त्यावर आणायला बंदी आहे. तिथे कधी रस्त्यावरून मिरवणुका जाताना दिसल्या नाहीत. म्हणून आजवर इथे विविध धर्मांचे १९३ देशांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. धार्मिक दंगली, हिंसाचार, प्रक्षोभक भाषणे यांना स्थान नाही. युएईचे नवे नेतृत्व आपली संस्कृती आणि परंपरा टिकवत असताना नवीन तंत्रज्ञान, नावीन्याची कास धरत आपल्या देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी कटिबद्ध आहे.
याच नेतृत्वाकडून २०१५ साली पंतप्रधान मोदींच्या युएई भेटीत ’बीएपीएस’च्या स्वामीनारायण मंदिराकडून मंदिर बांधण्याचा प्रस्ताव सध्याचे युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या पुढे ठेवण्यात आला. पण, याची सुरुवात १९९७ पासूनच करण्यात आली होती. त्यावेळचे स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख यांच्या मनात आखाती देशात एखादे ’बीएपीएस’चे मंदिर असावे, अशी इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी अबुधाबीची निवड केली. त्यावेळी सध्याच्या शेख मोहम्मदचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान युएईचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळची परिस्थिती पाहता, तिथल्या अनुभवी मंडळींनी ’बीएपीएस’च्या प्रमुखांना असा सल्ला दिला की, मंदिर बांधायला परवानगी मिळणे निव्वळ अशक्य आहे. कारण, या देशात मूर्तिपूजेला स्थान नाही, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक सेंटर बांधायला परवानगी मागा. ती कदाचित मिळू शकेल. पण, प्रमुखांना हे मान्य नव्हते. त्यांना विश्वास होता की, ’बीएपीएस’चे स्वामीनारायण मंदिर हे केवळ हिंदू धर्मासाठी नसून, सर्वधर्म समभाव यावर विश्वास ठेवणार्या, सकल मानव जातीचे कल्याण आणि विश्वबंधुत्वाची भावना जपणार्या प्रत्येक मानवाला मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा असेल त्याला एकात्मिकेचा संदेश देईल.
२००४ साली शेख झायेद यांच्या निधनानंतर युएईचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांची निवड झाली. ’बीएपीएस’ने आपले प्रयत्न सोडले नव्हते. पण, या कार्याला खरी गती मिळाली, ती शेख खलिफा यांचे बंधू शेख मोहम्मद आणि भारताचे पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यावर. ’बीएपीएस’च्या मदतीने मोदींनी शेख मोहम्मदला विनंती करायचा अवकाश की, त्यांनी लगेच अबुधाबीच्या अल इन रोडवर चार एकर जमीन देण्याचे आदेश दिले. २०१९ साली मंदिराच्या बांधकामाला लगेच सुरुवात झाली. आता १३ एकरची जागा २७ एकर झाली होती. शेख मोहम्मदच्या या औदार्याची कृतज्ञता म्हणून ’बीएपीएस’ने ठरवले युएई हे अबुधाबी, दुबई, शारजा, अजमान, रस अल खैमा, उम अल क्वैन फुजेराह अशी एकूण सात एमिरेट्सचे मिळून बनले आहे. हे सात एमिरेट्स स्वतःच्या राज्याची प्रगती साधत, देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत, तर या एकत्र गुण्यागोविंदाने नांदणार्या, सात एमिरेट्सचे प्रतीक म्हणून या मंदिराचे सात कळस बांधायचे ’बीएपीएस’ने ठरवले.
हे मंदिर बांधायचा खर्च ४०० दशलक्ष दिर्हाम्स येणार होता. त्यासाठी ’बीएपीएस’ने युएईतील अनेक भारतीय उद्योगपतींना आवाहन केले. त्याच्यांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. सर्वसामान्य नागरिकांकडून १०० दिर्हाममध्ये विटा (VITA)च्या सेवेतून विधिवत पूजाअर्चा करून देणग्या गोळा केल्या. ’बीएपीएस’ने मोठ्या कौशल्याने हा मोह टाळला आणि स्वबळावर मंदिरासाठी निधी उभारला. राजस्थान, गुजरातहून कुशल कामगार आणले आणि चार वर्षांत आखाती देशातील पहिले स्वामीनारायण मंदिर मोठ्या दिमाखात उभे राहिले.
या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आपण सर्वांनी पाहिला असेलच. तो पाहत असताना, दुबई-अबुधाबीमध्ये तीन-चार दशक घालवलेल्या, गेल्या चार दशकांतील भारतातील आणि युएईतील स्थित्यंतरे पाहिलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात मात्र एकच प्रश्न येतो की, २०१४ साली भारतात सत्तांतर झाले नसते, तर दि. १४ फेब्रुवारी छान दिवस आपल्याला बघायला मिळाला असता का? युएईने एक मुस्लीम राष्ट्र म्हणून स्वहित नेहमीच जपले; पण एक हिंदू म्हणून या देशात आम्हाला कधीच त्रास झाला नाही. या देशाच्या जडणघडणीत, उभारणीत सर्व धर्मीयांचा, सर्व देशातील नागरिकांचा महत्त्वाचा सहभाग आहे, याची जाणीव इथल्या राज्यकर्त्यांना आहे. कुवैत, कतार यांचे काही विचार कर्मठ प्रकारात मोडत असले, तरी त्यांच्या विचारांना आपल्या बाजूला परिवर्तीत करण्याची लवचिकता आपल्या परराष्ट्रीय धोरणात आहे. आपल्या आठ भारतीय अधिकार्यांची कतारने रद्द केलेली फाशीची शिक्षा हे याचेच द्योतक आहे. एकंदरीत एका मंदिराच्या उभारणीमागे दोन देशांमध्ये राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत, हीच ’मोदींची गॅरेंटी’ कामाला येणार आहे.
(लेखकाचे गेली ३५ वर्षं अबुधाबीत वास्तव्य होते.)
प्रशांत कुलकर्णी