मुंबई : मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. आपल्या हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि हिच इच्छा सूरज चव्हाणने बोलून दाखवली होती. बिग बॉस नंतर बारामतीला गावी पोहोचलेल्या सूरजचं गावात जंगी स्वागत झालं. पण, यादरम्यान काही करून हक्काचं घर बांधायचं हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. मोढवे गावी परतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला भेटीसाठी आमंत्रण दिलं होतं. या दोघांमध्ये भेट झाल्यावर अजित पवारांनी सूरजला लवकरात लवकर घर बांधून द्या अशी सूचना दिली होती.
दरम्यान, अजित पवारांनी दिलेल्या घोषणेनंतर सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा देखील संपन्न झाला होता. माध्यमांशी संवाद साधताना सूरजने “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झाला आहे. मला खूप बरं वाटतंय. अजित पवारांनीमाझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” असं सांगत त्यांचे आभार मानले होते. यानंतर सूरज चव्हाणने आज मंत्रालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
सूरजने अजित पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला की, “दादांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला त्यांना भेटायचं होतं. कधी एकदा त्यांना भेटायला येतो असं झालं होतं आणि घराबद्दल सांगायचं झालं तर, सध्या घराचं काम जोरात सुरू आहे. दादा सांगतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा! ते उपमुख्यमंत्री झालेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो.” दरम्यान, लवकरच सूरज चव्हाण केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटात झळकणार आहेच. त्याशिवाय इतर अनेक प्रोजेक्ट्समध्येही सूरज दिसणार आहे.