मध्य रेल्वेकडून गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुक्ष्म व्यवस्थापन

अनुयायांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था

    04-Dec-2024
Total Views | 34
Dadar Station

मुंबई : ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेबांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी राज्य आणि देशातून मोठ्या संख्येने येतात. यासाठी मध्य रेल्वेने ( Central Railway ) महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत.

दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी, आरपीएफ आणि जीआरपी यांच्याद्वारे चोवीस तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहेत. तसेच या कालावधीत अनारक्षित तिकिटे आणि ट्रेनच्या चौकशीसाठी चैत्यभूमी येथे दोन यूटीएस-सह- चौकशी काउंटर उघडण्यात आले आहेत. दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त यूटीएस काउंटर उघडण्यात आले आहेत.

प्रवाशांसाठी मार्गदर्शन आणि सुरक्षा:

या स्थानकांवर प्रवाशांचे योग्य मार्गदर्शन व्हावे आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर येथे २२३, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १६६, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १०५, ठाणे येथे १०३ आणि कल्याण येथे ७८ असे एकूण ६७५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) कर्मचारी २ पाळीमध्ये काम करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत, दादर येथे १२०, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४० आणि कल्याण येथे ३० कर्मचारी नियमित तैनात करण्यात आले आहेत.अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे २५० हून अधिक जीआरपी आणि ८० हून अधिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तैनात करण्यात आले आहेत.

गर्दी व्यवस्थापन

दादर येथील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ८ मधील उपलब्ध जागेजवळ होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. दादर येथील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्रवेश/निर्गमन योजना तयार केल्या जातील. दादर येथील गर्दी सुरळीत व्हावी यासाठी मध्य पूल आणि बीएमसी पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी दादर स्थानकावर “चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग”, “राजगृहाकडे जाण्याचा मार्ग” इत्यादी २१४ बॅनर लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवरील चौकशी कार्यालयाजवळ ट्रेन क्रमांक आणि विशेष गाड्यांच्या वेळा असलेले बॅनर/स्टँड लावले जातील. मध्यवर्ती उद्घोषणा प्रणाली आणि स्थानक उद्घोषणाद्वारे विशेष गाड्यांबाबत वारंवार घोषणा केल्या जात आहेत.

विशेष वैशिष्ट्ये:

संबंधित ठिकाणी पिण्याचे पाणी, वॉटर कुलर, स्वच्छ स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, व्हील चेअर, स्ट्रेचर आणि पुरेशा भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एकूणच पर्यवेक्षण आणि सुक्ष्म व्यवस्थापन

दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण येथे दि. ०५.१२.२४ च्या १६.०० ते ०९.१२.२४ च्या ०८.०० वाजेपर्यंत वाणिज्यिक निरीक्षकांना चोवीस तास तैनात केले जातील. गर्दीच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानकांवर अधिकारी तैनात केले जातील. गुप्तचर अधिकारी गर्दीचे प्रमाण वाढल्यास आणि इतर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त गाड्यांसारख्या गरजा पडताळून पाहण्यासाठी गर्दीचे निरीक्षण करतील. मध्य रेल्वेचे अधिकारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि हाताळण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत सहकार्याने काम करतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121