मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (HSSF Melawa in Mumbai) हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या वतीने नवीन वर्षाच्या प्रारंभी एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दि. ९ ते १२ जानेवारी या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) याठिकाणी सलग चार दिवस सदर मेळावा भरेल. गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या शुभहस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील.
हे वाचलंत का? : आचार्य किशोर कुणाल यांना सरसंघचालकांनी वाहिली आदरांजली
उद्योगपती संजय डांगी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. जितो (JITO)चे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी सदर यांची कार्यक्रमाला विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थिती असेल. तसेच सन्माननिय अतिथी म्हणून देवेंद्र ब्रह्मचारी आणि जाएंट वेलफेअर फाऊंडेशनच्या श्रीमती शाइना एनसी उपस्थित असतील. दि. ११ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री पीयून गोयल यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हिंदू अध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे कार्य चेन्नई येथून २००९ मध्ये सुरू झाले. हिंदू समाज आणि मठ मंदिरे करत असलेल्या सेवा कार्याशी सर्वसामान्य समाजाला जोडणे आणि हिंदू जीवनपद्धतीचे अविभाज्य भाग असलेल्या निसर्ग, कुटुंब आणि देश यांच्याबद्दल कर्तव्य आणि आदराची भावना दृढ करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. तर स्वेच्छेने मूल्यांना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे हे कार्याचे ध्येय आहे. याकरीता वन आणि वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संतुलन, कौटुंबिक आणि मानवी मूल्यांचे संवर्धन, महिलांचा आदर आणि देशभक्तीची बीजे रोवणे अशा एकूण सहा थीम निश्चित करण्यात आल्या आहेत.
मठ-मंदिर, सामाजिक संस्था (जात-समुदाय), सेवा कार्य करणाऱ्या संस्था, शाळा, महाविद्यालय, कॉर्पोरेट, प्रबुद्ध जनसंपर्क, मीडिया, महिला, शासकीय संस्था, कार्यालय, मेळा प्रबंध, प्री-फेअर एक्टिविटी असे एकूण १३ कार्यविभाग सक्रिय आहेत. प्रत्येक विभागाचे कार्य हिंदू अध्यात्मिक आणि सेवा संस्थानच्या नावाखाली केले जाते. इनिशिएटिव्ह फॉर मोरल अँड कल्चरल ट्रेनिंगच्या नावाखाली फक्त शाळा-कॉलेजचे काम केले जाते.