मृदू व्यक्तिमत्त्व, अभ्यासू अर्थतज्ज्ञ आणि सुधारणांसाठी कटिबद्ध नेतृत्व
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली
28-Dec-2024
Total Views | 17
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “डॉ. सिंग यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही साधारण कामगिरी नसून फाळणीनंतर भारतात आल्यानंतर बरेच काही गमावले. तरीही डॉ. सिंग यांनी यश प्राप्त केले,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
“एक ऋजू व्यक्ती, बुद्धिमान अर्थतज्ज्ञ आणि सुधारणांसाठी समर्पितपणे योगदान देणारा नेता म्हणून डॉ. सिंग यांचे नाव कायम स्मरणात राहील,” असे स्पष्ट करत अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. सिंग यांनी विविध स्तरांवर भारत सरकारसाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले,” असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. सिंग यांनी बजावलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, “माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पी. व्ही. नरसिंह राव, यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दाखविला आणि नव्या आर्थिक वाटेवर नेले. डॉ. सिंग यांनी पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. जनतेशी आणि देशाच्या विकासाप्रति असलेल्या डॉ. सिंग यांच्या बांधिलकीबद्दल कायमच त्यांच्याकडे आदराने पाहिले गेले,” असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
“डॉ. सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे प्रतिबिंब होते,” असेही मोदींनी अधोरेखित केले आहे. डॉ. सिंग यांची संसदीय कारकीर्द नम्रता, सौम्यता आणि बुद्धिमत्ता या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे उल्लेखनीय ठरली, याचाही पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डॉ. सिंग यांचा राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपण्याच्या अखेरच्या काळाची आठवण करून देत “त्याकाळात डॉ. सिंग यांनी समर्पितपणे केलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे. “शारीरिक आव्हाने असूनही व्हीलचेअरवर बसून महत्त्वाच्या सत्रांना उपस्थित राहून डॉ. सिंग यांनी आपली संसदीय कर्तव्ये पार पाडली. जगातील प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण घेऊनही आणि उच्च सरकारी पदे भूषवूनही डॉ. सिंग यांना त्यांच्या सामान्य पार्श्वभूमीच्या मूल्यांचा कधीही विसर पडला नव्हता.” आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आणि नंतर दिल्लीतही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर डॉ. सिंग यांच्यासोबत झालेल्या मनमोकळ्या चर्चांचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला आहे.
देशात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ शोक ठराव मंजूर केला. मंत्रिमंडळाने दोन मिनिटे मौन पाळून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनानंतर दि. 1 जानेवारी २०२५ रोजीपर्यंत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या शोक काळात देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील. दि. १ जानेवारी २०२५ रोजीपर्यंत सात दिवस विदेशांतील सर्व भारतीय मिशन्स, उच्चायुक्तांमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाईल. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कारांच्या दिवशी सर्व केंद्र सरकारी कार्यालये आणि केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांमध्ये अर्धा दिवस सुटी जाहीर केली जाईल.
आज होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आज शनिवारी २सकाळी ११:४५ वाजता निगमबोध घाट, नवी दिल्ली येथे अंत्यसंस्कार केले जातील.
भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या रुपाने आपण एक महान अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला आहे. दहा वर्षे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करताना त्यांनी भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. देशात मनमोहन सिंग यांची एक स्वतःची प्रतिमा राहिली आहे. अर्थशास्त्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, वित्त सचिव, मंत्री आणि पंतप्रधान या सर्व पदांवर असताना त्यांनी उत्तमरित्या आपले कर्तव्य बजावले. विशेषतः त्यांनी भारताला एक नवी आर्थिक दिशा देण्याचा प्रयत्न केला. देशाची सेवा करताना अनेक चांगली कामे त्यांनी केली. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. त्यामुळे अशा व्यक्तीचे आपल्यातून निघून जाणे, हे देशाचे मोठे नुकसान आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
धोरणी आणि हुशार राजकीय नेतृत्व हरपले!
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दुःखदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
भारतासाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहीलभारताचे माजी पंतप्रधान आणि देशाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश अत्यंत दुःखी झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आणि त्यांच्या प्रशंसकांप्रति तीव्र शोक व्यक्त करतो. प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे भारतासाठीचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या दिवंगत आत्म्याला सद्गती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
डॉ. सिंग यांच्या निधनाचे अतीव दु:ख
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दुःख झाले. त्यांची दृष्टी आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला कलाटणी देणारी ठरली. या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहेत.