मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर सोहळा संपन्न
24-Dec-2024
Total Views | 54
मुंबई : सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “संगीत मानापमान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सगळेजणं वाट पाहात आहेत. गेल्या दोन दिवसात मंत्रीमंडळ, खातेवाटप, बंगले वाटप करुन संगीत मानापमान या कार्यक्रमाला आलो आहे. आमच्याकडे मानअपमान मनात होतात आणि संगीत मीडियामध्ये वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की ११३ वर्ष जुना इतिहास असणाऱ्या संगीत नाटकाचे माध्यमांतर चित्रपटात होणार आहे आणि त्याचा साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली याचा आनंद आहे”.
पुढे फडणवीस म्हणाले की, “११३ वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनाला भूरळ घालण्याची क्षमता ज्या नाटकामध्ये आहे ते नाटक रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुबोध भावे यांनी बालगंधर्व साकारुन भामिनी साकारली आणि आता धैर्यधर देखील साकारत आहेत हा योगायोग आहे. संगीत नाटकांची परंपरा खऱ्या अर्थाने मराठी भाषेला लाभली आहे. आणि सर्व परंपरा नव्या पिढीसमोर येणं आवश्यक आहे. सध्याच्या पिढीकडे ६७ पदं ऐकण्याचं धैर्य नसेल पण याचं सौंदर्य चित्रपटातील १४ पदं नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातून नव्या पिढीमध्ये संगीत नाटकाची गोडी निर्माण होईल यात शंका नाही. शंकर-एहसान-लॅाय यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर केलेलं प्रेम अत्यंत महत्वाचं आहे.
दरम्यान, सुबोध भावे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान दिलं जातं याचं वाईट वाटतं. त्यामुळे सरकारकडून आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीला पाठबळ द्यावं”, असं गाऱ्हाणं घातलं. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “सुबोध भावे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी केलेली मागणी आणि विविध कलांना योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे यासाठी काम करण्याची सरकारची इच्छा आहे. बऱ्याचवेळी उत्कृष्ट चित्रपट जे प्रेक्षकांना भावतात पण त्या दिग्दर्शकांना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळत नाही हे ऐकून वाईट वाटतं. मात्र, भविष्यात मराठी चित्रपटांना आणि अशा अनेक कलाविष्कारांना प्लॅटफॅार्म उपलब्ध करुन देऊ.”