द्रोणाचार्याने कापला होता एकलव्याचा अंगठा; राहुल गांधींनी तोडले अकलेचे तारे

    14-Dec-2024
Total Views |
rahul and anurag

नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी आज लोकसभेत चर्चेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्र सरकारवर राज्यघटनेवर हल्ला केल्याचा आरोप केला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. ते म्हणाले, आपल्या राज्यघटनेत भारतीय असे काहीही नाही, असे सावरकरांनी आपल्या लेखनात स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळे लढा मनुस्मृती आणि संविधान यांच्यात आहे. आता की सावरकरांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवायचा की संविधानावर. कारण जेव्हा तुम्ही राज्यघटनेचे गुणगान करता तेव्हा तुम्ही एक प्रकारे सावरकरांना विरोध करता, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा कापला, त्याचप्रमाणे केंद्र सरकार देशातील तरुणांसोबत करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, धारावीतील व्यवसाय आणि देशातील बंदरे अदानीस देणे म्हणजे छोटे व्यापारी आणि प्रामाणिक व्यावसायिकांचा अंगठा कापणे आहे. लॅटरल एन्ट्रीद्वारे, पेपरफुटीद्वारे आणि अग्नीवीर योजनेद्वारे देशातील तरुणांचास अंगठा कापण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही जातगणना करणार असून त्याद्वारे आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंत तोडू, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राहुल गांधींनी संविधान वाचावे आणि गांधी घराण्याने संविधानास वेळोवेळी कसे धाब्यावर बसवले ते वाचावे. अंगठे कापल्याचा दावा करणाऱ्यांच्या पक्षाच्या सरकारने १९८४ साली देशातील शिखांचे गळे कापरले होते, याचा त्यांना विसर पडला असल्याचा टोला ठाकूर यांनी लगावला.

संविधान हाती घेऊन फिरणाऱ्यांना त्याची नेमकी पानेही माहिती नसल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, राहुल गांधी यांच्याकडे असलेल्या संविधानाची पॉकेट एडिशन ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायण यांनी संकलित केली आहे. त्यांनी त्याच आवृत्तीमध्ये गोपाळ शंकरनारायण यांनी नेहरूजींच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि के.एम. मुन्शी यांच्या संविधानाला श्रेय दिले आहे. त्याच आवृत्तीमध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीने लोकशाही कशी संपवली, असेही लिहिलेले असल्याचे ठाकूर म्हणाले.

तुमची आजी संविधानविरोधी होती का – डॉ. श्रिकांत शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राहुल गांधींनी केलेल्या अपमानाचा विरोध शिवसेना खासदार डॉ. श्रिकांत शिंदे यांनी केला. ते म्हणाले, इंदिरा गांधी या नेहमीच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर करत. त्यांनी तसे पत्रदेखील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीस पाठवले होते. त्यामुळे तुमची आजीदेखील संविधानविरोधी ठरते, असा सवाल डॉ. शिंदे यांनी विचारला.