विधानसभा निवडणूकीतून जरांगेंची माघार! हे आहे कारण...
04-Nov-2024
Total Views | 178
जालना : मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी २५ जागा लढवण्याची घोषणा केली होती. परंतू, मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्याचे कारण देत त्यांनी सोमवारी सकाळी निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
मनोज जरांगे म्हणाले की, "आमच्या मित्रपक्षांची यादीच आली नाही. एका जातीवर निवडणूक लढवणं कसं शक्य आहे? त्यामुळे आमचा थोडा नाईलाज आहे. यावर आमची रात्री ३ वाजता चर्चा झाली. एका जातीवर जिंकणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाहीत."
"कुणीही राज्यात एका जातीवर निवडणूक जिंकू शकत नाही. ते दोन्ही आमचे बांधव आहेत. काल यादी यायला हवी होती. ते पाठवतो म्हणाले, परंतू, आली नाही. त्यामुळे यादी न आल्याने लढणार कसं? एका जातीवर निवडणूक लढवायची नाही, असं सर्वांचं म्हणणं होतं. महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी अर्ज काढून घ्यावेत. राजकारण हा आपला खानदानी धंदा नाही. आपलं आंदोलन सुरुच राहणार आहे. निवडणूक संपल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरु होईल. परंतू, एका जातीवर या गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही तर सगळे उमेदवार पाडायचे आहेत," असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे सुरुवातीपासूनच राज्यातील २८८ जागा लढण्याच्या घोषणा करत होते. त्यासाठी त्यांनी हजारों उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहनही केले होते. मात्र, अनेक बैठकांवर बैठका घेऊन त्यांनी अचानक सोमवारी निवडणूकीतून माघार घेण्याची घोषणा केली. मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केले असते तर महाविकास आघाडीला याचा फटका बसला असता. मराठा समाजाच्या मतांचं विभाजन होऊन मविआच्या मताधिक्यात फरक पडला असता. त्यामुळेच जरांगेंनी निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.