मुंबई : महायुतीतर्फे रविवारी दि. १० नोव्हेंबर रोजी ‘संकल्पपत्र’ आणि मविआकडून ( MVA ) ‘महाराष्ट्रनामा’ नावाखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, मविआच्या जाहीरनाम्यातील महापुरुषांच्या छायाचित्रांमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे छायाचित्र वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जाहीरनामा जरी मविआचा असला, तरी त्यावर वरचष्मा हा काँग्रेसचाच असल्याचे स्पष्ट होत आहे.
मविआने दि.१० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्रनामा’ नामक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये अनेक लोकप्रिय आणि आकर्षक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामध्ये आतील पानावर सर्व समाजातील महापुरुषांचा समावेश आहे. यामध्ये जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सवित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांची छायाचित्रे ‘वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा’ या शीर्षकासहित प्रसिद्ध केले आहेत. मात्र, मातृभूमी आणि मायमराठीसाठी ज्यांचे योगदान अतुलनीय आहे, ज्यांचा वारसा विचारांचाही आहे आणि मार्ग संघर्षाचा आहे, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांना या महापुरुषांच्या छायाचित्रांमध्ये स्थान न देण्याचा करंटेपणा मविआने केला आहे.
राजकीय भूमिकांचा विचार केल्यास, महाविकास आघाडीबरोबर सलोखा करण्याआधी उद्धव ठाकरे यांना स्वा. सावरकरांचे वावडे नव्हते. तसेच, २०२३ साली नाशिक येथील सभेत, “देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत, म्हणून सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. सावरकर आमचे दैवत आहेत,” असा इशाराही उद्धव ठाकरेनी सावरकरांचा वारंवार अपमान करणार्या राहुल गांधी आणि काँग्रेसला दिला होता. पण, मविआच्या काळातही ‘किमान समान कार्यक्रमा’अंतर्गत ठाकरेंनी या प्रकरणी कायमच बोटचेपी भूमिका घेतली आणि आताही तीन्ही पक्षांच्या संमतीने तयार केलेल्या या जाहीरनाम्यात सावरकरांचे छायाचित्र वगळण्यात आले आहे. पण, त्यावरही ठाकरेंना ना खंत, ना खेद.
तसेच, “सावरकरांशी असलेले मतभेद हे व्यक्तीगत नसून, हिंदू महासभेच्या भूमिकेविषयी आहेत. असे असले तरीही, सावरकरांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान नाकारता येणारे नाही,” असे वक्तव्य दस्तुरखुद्द शरद पवार यांनीही साल २०२३ मध्येच केले होते. मग, असे असताना आज महाराष्ट्रातील महापुरुषांच्या यादीत सावरकरांना स्थान नाकरण्याचा करंटेपणा फक्त काँग्रेसच्या अट्टहासापायीच झाला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविक पाहता, मविआच्या जाहीरनामा समितेचे प्रमुखपदाची जबाबदारी, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना उबाठाच्यावतीने सुभाष देसाई, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने अॅड. वंदना चव्हाण यांच्या खांद्यावर होती. पण, काँग्रेसच्या वतीने जाहीरनामा समिती प्रमुख असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनीही सावरकरांचा तुलनात्मक अभ्यास मांडताना, “स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक होते. अमानुष छळ असणारी काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी देशासाठी भोगली होती. तसेच, सावरकर हे उत्तम लेखक आणि कवी होते,” असे 2022 साली एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्याच मुलाखतीमध्ये इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या देशभक्तीसाठी त्यांच्यानावे स्टॅम्पही काढल्याचे नमूद केले होते. मग आज जाहीरनाम्यातील महापुरुषांच्या यादीमध्ये सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश करण्याची वेळ आली, तेव्हा नेमके कोणाचे मन राखण्याची कसरत पृथ्वीराजबाबांना करावी लागली? असा प्रश्नही निर्माण होतो. याचाच अर्थ महाराष्ट्र काँग्रेसलाही ‘महाराष्ट्र धर्म’ याचे काहीही पडले नसून, निव्वळ राहुल गांधी यांच्या ‘गुड बुक्स’मध्ये येण्यासाठी त्यांची हांजीहांजी करण्यातच धन्यता मानताना दिसतात.
जाहीरनाम्यात काँग्रेसचाच वरचष्मा!
काँग्रेसला सावरकरांविषयी तीव्र द्वेष असून, राहुल गांधींनी कायमच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे. हीच सावरकरविरोधाची काँग्रेसी खदखद महापुरुषांच्या यादीतील सावरकरांचे छायाचित्र वगळून मविआने व्यक्त केली आहे. त्यामुळेच या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस विचारांचा वरचष्मा असल्याचे उघड झाले आहे.