मुंबई, दि.१२ : प्रतिनिधी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने शीख समुदायासाठी एक अनोखे पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ५ गुरुद्वारांना भेट दिली जाईल. भारत गौरव ट्रेन चालवून हे दर्शन करण्यात येणार आहे. दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा दौरा नऊ रात्री आणि १० दिवस चालणार आहे. या दौऱ्यात नांदेड येथील श्री हुजूर साहिब, पाटणा येथील श्री हरमंदिर जी साहिब, आनंदपूर येथील श्री केशगर साहिब, अमृतसर येथील श्री अकाल तख्त साहिब आणि भटिंडा येथील श्री दमदमा साहिबचे दर्शन घेतले जाईल.
ही सहल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापासून सुरू होईल. आतापर्यंत या पॅकेजला लोकांकडून प्रतिसाद मिळाला नसला तरी IRCTCने लवकरात लवकर बुकिंग पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सहल स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १९६५० रुपये, थर्ड एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी २८५०५ रुपये आणि सेकंड क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी ३८७७० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जानेवारीत होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी एक विशेष ट्रेनही चालवली जाईल, ज्यामध्ये प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या असा प्रवास केला जाईल.