पुणे : अजित पवार गटाच्या मेळाव्यातील बॅनरवर माजी मंत्री नवाब मलिक यांचे छायाचित्र लागल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी भूमिका पक्की आहे. जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे. त्यापासून आम्ही तसूरभरही दूर झालेलो नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
भाजपाच्या नवीन पुणे कार्यालयात आयोजित संघटनांत्मक बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलत होते. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत केलेल्या टिकेला उत्तर देताना देखील फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांचा समाचार घेतला, त्यांचा गृहमंत्री होता त्या वेळी किती आलबेल होते. त्यावेळी अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, गृहमंत्रीवर शंभर कोटींचे आरोप लागत नव्हते, साक्षीदारांची हत्या होत नव्हती. किती चागलं काम होते आणि वाझे तर लादेन नव्हताच, त्यामुळे यावर काय उत्तर द्यायचे ? भूमिका बदलतात, असे ते म्हणाले. आमदार सुनील कांबळे प्रकरणी सुप्रिया सुळे सांगतील म्हणून काही गोष्टि करायच्या नसतात. जी कारवाई करायची आहे ती पोलिसांनी केली आहे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी सगळे योग्य वेळी होईल, असे सांगितले. तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला त्या पार्श्वभूमीवर प्रकरणी त्यांनी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली. राम मंदिर उद्गाटनाचा मुद्दा भाजपकडून लोकसभेच्या तयारीसाठी वापरला जात असल्याबद्दल विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा राम भक्तांचा, कारसेवकांचा, रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. श्रद्धा असलेला प्रत्येक जण या सोहळ्यासाठी जात आहे. याबद्दल कोणालाच दु:ख होण्याचे कोणतेच कारण नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेवरील प्रश्नांच्या उत्तरात फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कुठल्याही मंदिरात चालले हेही नसे थोडके.
लोकसभा, विधानसभेत मोठा विजय महायुतीला
कार्यालये ही आमची प्रेरणेची जागा आहे. पुण्यात नवीन कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात भाजपाचे काम चांगले आहे, असे सांगितले. त्यामुळे लोकसभा व विधानसभेत प्रचंड मोठा विजय महायुतीला येथे मिळेल, असा विश्वास असल्याचेही ते म्हणाले. आजची पुण्यात झालेली भाजपाची नियोजन बैठक होती. निवडणुकापूर्वी सहसा आम्ही मधूनमधून बैठका घेत असतो, यात निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांची मते ऐकून घेतली जातात. यात जागांवर चर्चा होत नाही, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीची तयारी कशी केली पाहिजे, संघटनांत्मक बाबीवर यात चर्चा असते. संघटनमंत्री यासाठी आले होते. त्यांनी याचा आढावा घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.