मुंबई : उबाठा गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने चौकशीकरिता हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. त्यांना गुरुवारी २५ जानेवारीला ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, आता अटक टाळण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील बॉडीबॅग घोटाळ्याचा आरोप आहे. येत्या १४ फेब्रुवारीला याप्रकरणी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने मुंबई पोलिसांना मनाई केली आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांना याप्रकरणात दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे, मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या फाईव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.