मुंबई : स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्रातील विविध चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केले आहे. अशातच 'सत्यशोधक' सिनेमाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
सत्यशोधक सिनेमाच्या टीमने लवकरच या चित्रपटाचा प्रिमियर थेट न्यूझीलंडमध्ये होणार असल्याचे जाहिर केले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे हा प्रिमियर सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
न्यूझीलंडमधील राजदूत, हॉलिवूड स्टार्स यांच्या 'सत्यशोधक' चित्रपटाचा रेड कार्पेट प्रीमियर फेब्रुवारी २०२४ मध्ये रंगणार आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रथमच ही घटना घडली आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री झाल्याची घोषणा केली होती. अधिकाधिक लोकांपर्यंत सत्यशोधक चित्रपट आणि फुले दाम्पत्याचे काम पोहोचावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
'सत्यशोधक' चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली असून आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत.