ज्येष्ठ गायिका ‘पद्मविभूषण’ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच रोजी निधन झाले. हिंदुस्थानी संगीतातील एक दिग्गज विचारवंत कलाकार असणार्या, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना वाहिलेली ही आदरांजली.
कोणत्याही सांगीतिक परिवाराची पार्श्वभूमी नसूनही, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रात भरीव योगदान देणार्या कलाकारांमध्ये एक प्रमुख नाव म्हणजे ‘पद्मविभूषण’ डॉ. प्रभा अत्रे. गायिका, रचनाकार, गुरू, संगीत विचारवंत, कवयित्री, गायिका-अभिनेत्री असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. वयाच्या नव्वदीच्या टप्प्यापर्यंत अगदी निधनापर्यंत त्यांचा सांगीतिक प्रवास अविरतपणे चालू होता, ही बाब त्यांच्याविषयी अत्यंत आदरभाव निर्माण करणारी आहे. भारतातील ज्येष्ठ संगीतकारांमध्ये मानाचे स्थान असलेल्या, प्रभाताईंचा सांगीतिक प्रभाव गेल्या तीन पिढ्यांतील अनेक कलाकारांवर आहे.
उस्ताद अब्दुल करीम खाँ प्रणित किराना गायकी २०व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. विजय करंदीकर यांच्याकडून प्राथमिक संगीत शिक्षण घेतल्यानंतर, प्रभाताईंनी उ. अब्दुल करीम खाँ यांचे पुत्र पं. सुरेशबाबू माने यांच्याकडून ख्याल गायकीची तालीम घेतली. गानपंडिता हिराबाई बडोदेकर यांच्या सहवासात मैफल रंगवण्याचे तंत्रही त्यांनी आत्मसात केले. कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेल्या, प्रभाताईंनी उ. बडे गुलाम अली खाँसाहेबांसारख्या अनेक दिग्गजांचे गायन ऐकलेचा; पण उ. आमीर खाँसाहेबांच्या शैलीने त्या विशेष प्रभावित झाल्या. प्रभाताईंनी सौंदर्यात्मक बुद्धिमत्ता आणि स्वतःच्या गळ्यानुसार गायकीचा विचार केला आणि त्यातून त्यांची वेगळी गायनशैली सिद्ध झाली. त्यामुळे किराना गायकीला प्रभाताईंनी एक आगळे परिमाण दिले, असे नक्कीच म्हणता येते.
प्रभाताईंचे गायन ऐकताच, पहिली छाप त्यांच्या मधुर आणि नाजूक आवाजाची पडत असे. स्वरशब्दांचे स्पष्ट, भावपूर्ण आणि तरल उच्चार, कल्पक सरगम यांचा प्रभाव पडत असे. मधुर आणि सुरेल आवाजामुळे त्यांचे गायन सामान्य श्रोत्याला आकर्षित करत असे, त्याचप्रमाणे प्रबुद्ध श्रोत्यालाही त्यांच्या गायकीतील वैचारिक परिपक्वता अनुभवास येई. ‘सरगम’ ही प्रभाताईंची खासियत मानली जाते. आपल्या पूर्वसूरींपेक्षा प्रभाताईंनी ‘सरगम’ हे अंग वेगळ्या प्रकारे मांडले आणि त्यातून प्रभाताईंची खास अशी ‘सरगम शैली’ बनली. प्रभाताईंनी ‘सरगम’ला ख्याल गायकीच्या विस्ताराचे एक सशक्त आणि अनिवार्य अंग म्हणून स्थापित केले. ‘सरगम’ आणि तानेत ‘मेरुखंड’ आणि ‘बिडार’ अंग असूनही त्यांचे गायन केवळ चमत्कृतीयुक्त वा ‘अॅक्रोबॅटिक’ वाटत नाही, ते भावनेने ओथंबलेले होते.
गुंतागुंतीची स्वरवाक्ये असलेल्या मिश्र किंवा वक्र चलनाच्या रागांपेक्षा शुद्ध, सरल येणे-जाणे असलेले विस्तृत आणि भावप्रधान रागच प्रभाताईंनी बव्हंशी गायले. मैफिलीत गायलेले त्यांचे काही राग मी एक श्रोता आणि संगतकार म्हणून स्वतः ऐकले आहेत, ते असे की ‘यमन’, ‘पूरीयाकल्याण’, ‘शंकरा’, ‘बिहाग’, ‘चंपाकली’, ‘बागेश्री’, ‘मालकंस’, ‘चंद्रकंस’, ‘मधुकंस’, ‘जोगकंस’, ‘बसंत’, ‘ललित’, ‘भैरव’, ‘अहिरभैरव’, ‘नटभैरव’, ‘रामकली’, ‘तोडी’, ‘मधुवंती’ इ. हिंदुस्थानी रागांखेरीज ‘कीरवाणी’, ‘चारुकेशी’, ‘बसंतमुखारी’ इ. दाक्षिणात्य रागही त्यांनी गायले. त्यांच्या नवनिर्मित रागांपैकी ‘अपूर्वकल्याण’, ‘मधुरकंस’, ‘तिलंगभैरव’, ‘रविभैरव’, ‘पटदीप मल्हार’ हे विशेष वाखाणले गेले. त्यांच्या राग सादरीकरणात बौद्धिकता असूनही विनाकारण क्लिष्टता नव्हती; कारण त्याचा भर भावात्मकतेवर होता. ‘श्यामकल्याण’ (ज्याला त्या ‘सारंगकल्याण’ म्हणत), ‘जोगकंस’ इ. रागांना प्रचलित स्वरुपापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिले आणि सादर केले. अशा सादरीकरणांमध्ये त्यांची बौद्धिकता आणि भावनिकता यांचा संगम दिसून येई.
प्रभाताईंनी संगीताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत संचार केला. ख्याल गायनासह ठुमरी-दादरा, गझल, नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीते हे सर्व प्रकार त्यांनी गायले. या सर्व शैली उत्तम प्रकारे सादर करूनही त्यांचा स्वाभाविक कल ख्याल आणि ठुमरी यांकडेच होता. एकीकडे ख्यालगायकीचे सर्व नियम पाळूनही प्रभाताईंनी ठुमरीचे सौंदर्य, नजाकत आणि भावात्मकता ख्यालात अंतर्भूत केली, तर दुसरीकडे त्यांनी ठुमरीत ख्यालाच्या विस्तारपूर्वकतेचा विचार आणला. वेगवेगळ्या रागांमध्ये ठुमरी शैलीच्या रचना बांधल्या. ठुमरीची शारीरिकता वा मादकता आणि शाब्दिक आशयावरचा भर कमी करून, प्रभाताईंनी ठुमरीला अमूर्ततेच्या दिशेने नेले. मला वाटते की, यासंदर्भात प्रभाताईंनी त्यांचे आजोबा-गुरू उ. अब्दुल करीम खाँसाहेबांनी सुरू केलेले संकल्पनात्मक आवर्तन पूर्ण केले.
‘जागू मैं सारी रैना’ (मारुबिहाग) आणि ‘तन मन धन तोपे वारू’ (कलावती) या दोन बंदिशींमुळे प्रभाताई ‘बंदिशकार’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी केवळ या दोनच बंदिशींची रचना केली असती, तरी ख्यालाच्या बंदिशकारांच्या परंपरेत त्यांचे नाव चमकत राहिले असते, इतक्या या बंदिशी सुंदर, आकर्षक आहेत. प्रभाताईंच्या बहुतांश बंदिशी ‘ख्याल’ घाटाच्या आहेत आणि त्यांनी तराणेही पुष्कळ रचले. त्या खालोखाल ठुमरी-दादरा आणि भजने यांची संख्या आहे आणि ‘चतुरंग’, ‘टप्पा’ प्रकारच्या रचना अत्यल्प आहेत. तराण्याच्या संदर्भात प्रभाताईंचे विशेष योगदान आहे. त्यांनी रचलेल्या तराण्यांत बोलांचे नादमय गुंजन, लयीशी सुखद खेळ आणि स्वरशब्दांची पुनरुक्ती करून वेधक आकृतिबंध बनवण्याची खुबी दिसते. काही तराण्यांत ‘सरगम’चा वापरही खूप प्रभावी आहे आणि त्यात कर्नाटक शैलीतील स्वरोच्चारांचा मोहक वापर आहे. काही तराण्यांत कर्नाटक शैलीतील तिल्लाना किंवा ओडिशी संगीतातील पल्लवीप्रमाणे शब्दयोजना असल्याने त्यात आगळा नादरंग, गोडवा जाणवतो. या प्रकारचा ‘मांजखमाज’मधला त्यांचा तराणा फार लडिवाळ आहे. या तराण्यांतील लालित्य, गुंजन आणि नृत्यमयतेमुळे ते क्लिष्ट न वाटता, सहज गुणगुणावे असे सोपे वाटतात. द्रुत एकतालातील त्यांचे बरेचसे तराणे हे नृत्यानुकूल आहेत. माझ्या मते, हेमावती रागातील प्रभाताईंचा चतुरंग हा त्यांच्या बंदिश निर्मितीतील एक सर्वोत्तम रचना आहे. प्रभाताईंची ही रचना कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत प्रवाहांच्या मीलनाचे सुंदर प्रतीक आहे.
प्रभाताईंच्या बव्हंशी बंदिशी त्रिताल, एकताल, झपताल, रूपक, झूमरा या तालांत आहेत. एखादी बंदिश आडाचौतालात आहे. त्यामुळे वरवर पाहता, त्यांच्या बंदिशींत तालाचे वैविध्य नाही असे वाटते. परंतु, प्रभाताईंच्या बंदिशींत लय वैविध्य नक्कीच आहे. शब्द आणि स्वरवाक्य त्या ज्या प्रकारे लयीत गुंफतात, ते लक्षणीय आहे. कधी बंदिशींचा मुखडा अगदी बाळबोध वाटावा इतका सोपा आहे, तर काहींमध्ये पेचिदा आणि प्रभावी आमद आहे. प्रभाताईंच्या बंदिशींत भक्ती, प्रेम (वियोग अथवा मीलन शृंगार), नीतिविचार, ऋतुवर्णन हे चार मुख्य विषय आहेत. शब्दमाधुर्य, नादात्मकता आणि गेय शब्दांची योजना, सरलता यांमुळे प्रभाताईंच्या बंदिशी काव्यात्मक विषयात फारसे वेगळेपण नसूनही मोहक आणि प्रभावी वाटतात. प्रभाताईंच्या रचनांत एक प्रकारची स्त्रीसुलभ उत्फुल्लता, मार्दव नक्कीच आहे.
प्रभाताईंच्या काही रचना पूर्वसूरींच्या रचनांना दिलेला प्रतिसाद वाटाव्या अशा आहेत. उदा. पूरियाधनाश्रीतील ‘तोरी जय जय करतार’ हे ‘बैजू बावरा’ चित्रपटातील उ. आमिर खाँसाहेबांनी गायलेल्या रचनेचे रुपांतर आहे. कीरवाणीतील ‘तोरे बिना मोहे’ या बंदिशीची स्थायी रामपूर-सहस्वान परंपरेतील लोकप्रिय बंदिशीवरून बेतली आहे; मात्र त्याचे दोन अंतरे स्वतंत्रपणे रचलेले आहेत. पं. रविशंकरांनी रचलेल्या परमेश्वरी रागातील, रुपक तालातील ‘मातेश्वरी परमेश्वरी’ या सुप्रसिद्ध बंदिशीला प्रतिसाद म्हणून प्रभाताईंनी या बंदिशाची जोडा बांधला.
ठुमरी-दादरा प्रकारातील रचनांमध्ये प्रभाताईंच्या प्रतिभाविलासाचे विशेष खुललेले रंग जाणवतात. ठुमरीसाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या ‘खमाज’, ‘देस’, ‘झिंझोटी’, ‘तिलंग’, ‘मांजखमाज’, ‘पहाडी’, ‘काफी’, ‘पिलू’, ‘गारा’ इ. धुनरागांत रचना करताना प्रभाताईंनी वेगळ्या स्वरवाक्यांना मांडून, या धुनरागांच्या काहीशा घिशापिट्या रुपांना जणू काही संजीवनीच दिली. ठुमरीच्या या प्रचलित रागांखेरीज प्रभाताईंनी मिश्र कनकांगी, मिश्र मांड-भैरव, मिश्र काफी-रंजनी, मिश्र काफी-मल्हार, मिश्र मल्हार, गारा-मल्हार इ. जोडराग रुपे वापरली. मिश्र नायकी कानड्यात रचलेल्या ‘बसंती चुनरिया लावो मोरे सैयां’ या दादर्यात मघई लोकगीताची खुशबू आहे. साधारणपणे ठुमरीचे मुखडे छोटे असतात; पण प्रभाताईंनी लांब मुखड्यांच्या ठुमर्याही अतिशय आकर्षकपणे रचल्या. भजन, मराठी गझल आणि भावगीताच्या रचनांतून प्रभाताईंची सुगम संगीतावर पक्की पकड दिसून येते.
हिंदुस्थानी संगीत क्षेत्रात एक यशस्वी प्रस्तुतीकार (परफॉर्मर)असूनही संगीतशास्त्रात रुची घेऊन विचार आणि लेखन करणारे कलाकार दुर्मीळ आहेत. ‘आम्ही फक्त दोन तंबोर्यांत बसून गातो-बोलणे किंवा लिहिणे आमचे काम नाही’ किंवा ‘ज्यांना गाणेबजावणे नीट जमत नाही तेच संगीतावर लिहितात-बोलतात’ अशा प्रकारची जुनाट, कुचकट मानसिकता आजही अनेक कलाकारांत दिसते. कलावंतांना सर्वोच्च स्थानी बसवून पूजणारे, अनेक लोकसंगीतातील विचारवंत किंवा शास्त्रकारांना तुच्छ लेखण्यातच धन्यता मानतात. अशा परिस्थितीतही अपवाद म्हणून काही मोजक्याच कलावंतांनी संगीतशास्त्राचे अवगाहन करून लेखन केले आणि मोजक्या कलाकारांमध्ये डॉ. प्रभा अत्रे यांचे नाव आघाडीवर आहे.
संगीतशास्त्राचे तीन स्तर आहेत-(१) संगीतात्म शास्त्र (कला प्रस्तुतीशी प्रत्यक्ष संबंधित विचार), (२) संगीतविषय शास्त्र (कला प्रस्तुतीशी अप्रत्यक्षपणे किंवा दूरस्थ नाते असणारे विचार), आणि (३) संगीतसंबद्ध शास्त्र (संगीताच्या अन्य अभ्यासशाखांच्या सहयोगाने होणारा विचार, संस्कृती-संगीतशास्त्र). प्रस्तुतीकार कलावंतांना सामान्यतः संगीतात्म शास्त्रच केवळ ठाऊक असते आणि तेही मुख्यत्वे मौखिक परंपरेतून आलेले ज्ञान असते. प्रस्तुतीकारांनी शास्त्रावर कधी बोलले-लिहिलेच तर ते या स्तरावरचे असते आणि तेही बरेचदा प्राथमिक स्वरुपाचे असते. संगीतविषय शास्त्र या दुसर्या स्तरावरच्या संगीतशास्त्रात रुची वा गती मोजक्याच कलाकारांना असते. मात्र, संगीतसंबद्ध शास्त्र या तिसर्या स्तरावरील संगीतशास्त्राचे ज्ञान वा कलही बव्हंशी कलावंताचा नसतो. एवढेच नव्हे, अशा प्रकारचे काही संगीतशास्त्र असते याची प्राथमिक माहितीही बरेचदा नसते. अशा परिस्थितीत प्रभाताईंच्या व्यक्तित्त्वाचे वेगळेपण अधोरेखित होते.प्रभाताईंनी संगीतविषय शास्त्र आणि संगीतसंबद्ध शास्त्रात रुची घेतली. जरी त्या संगीतशास्त्राच्या या स्तरांत प्रत्यक्ष सक्रिय नसल्या, तरी त्यांना या आयामांची निश्चित जाण होती.
प्रभाताईंचे विचार आणि लेखन हे मूलतः संगीतात्म शास्त्राच्या स्तरावरचे आहे आणि काही अंशी त्यांनी संगीतविषय शास्त्राबद्दलही लेखन केले. ‘स्वराली’, ‘स्वरमयी’ या पुस्तकांच्या नंतरच्या आवृत्त्यांमध्ये आणि त्यांच्या हिंदी अनुवादांमध्ये प्रभाताईंनी अनेक ठिकाणी अद्यतनीकरण (अपडेट करणे) केले होते. त्यांच्या विचार प्रक्रियेत खंड पडला नव्हता, हेच यातून सूचित होते. या पुस्तकांव्यतिरिक्त ‘आलोक’व्याख्यानमालेतूनही प्रभाताईंनी सांगीतिक विचार ठळकपणे मांडले. त्यांची मते एका अनुभवी प्रस्तुतीकाराची होती. प्रयोगपरंपरेतील सशक्त कलाकाराची होती आणि म्हणूनच प्रभाताईंच्या अनुभवसिद्ध विचारांना संगीताच्या प्रयोगपरंपरेत खूप महत्त्व आहे.
प्रभाताईंनी एक लोकप्रिय गायिका म्हणून कारकिर्द केली असली, तरी आरंभीच्या काळात संगीत नाटकांत गायिका-अभिनेत्री म्हणून, मग आकाशवाणीवर संगीत कार्यक्रमांची निर्मिती-अधिकारी म्हणून आणि त्यानंतर एसएनडीटी विद्यापीठाच्या संगीत विभागात संचालक, अध्यापक म्हणूनही काम केले. संगीत शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. अशा बहुआयामी स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांची गायकी, बंदिशी, विचार आणि लेखनाचे पाथेय भविष्यातील अनेक संगीत साधकांना नक्कीच प्रेरणादायी असेल. त्यांच्या उत्तुंग कलाकर्तृत्वाला वंदन!
डॉ. केशवचैतन्य कुंटे