मुंबई : नवीन वर्षात प्रेक्षकांना मालिका, चित्रपट आणि ओटीटी या तिन्ही मनोरंजनाच्या माध्यमांवर नानाविध आशय पाहता येणार आहे. यात प्रामुख्याने प्रभू श्री राम यांच्याभोवती फिरणाऱ्या कलाकृतींचा सहभाग अधिक असणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून यासाठी देशभरातील लाखो रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटिकांमधून आशयनिर्मिती आपण पाहात आलो आहोत. आता पुन्हा एकदा नव्या वर्षात एकाचवेळी मनोरंजनाची सर्व प्रमुख माध्यमे ‘राममय’ होताना दिसणार आहेत. सोनी हिंदी वाहिनीवरील यात 'श्रीमद् रामायण' या मालिकेत रामायणाची कथा आणखी भव्यदिव्य शैलीत दाखवली जाणार आहे. तर, दिग्दर्शक नितीश तिवारी ‘रामायणा’ चित्रपट साकारणार असून यात रणबीर कपूर श्रीरामाच्या आणि साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक प्रशांत वर्मा 'हनुमान' या चित्रपटात आजच्या २१व्या शतकातील आधुनिक हनुमान कसा असेल या आशयाचा हा चित्रपट १२ जानेवारीला प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. तेलुगू भाषेतील ‘हनुमान’ हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्येही डब करण्यात आला आहे.
डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी वाहिनीवरील 'द लिजेंड ऑफ हनुमान' या अॅनिमेटेड सीरिजच्या दोन सीझनला यश मिळाल्यानंतर आता तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पौराणिक कथांना कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकवर्ग प्रतिसाद देतच असतो हे यावरुन सिद्ध होते.