मुंबई : ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांबद्दल बोलताना त्यांना सांगितले की, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांमध्ये ७२ होस्टेलचा प्रस्ताव आहे. त्यातल्या ५२ ठिकाणी होस्टेलची जागा घेतलेली आहे. तिथे पुढच्या एक ते दीड महिन्यात होस्टेल सुरु करण्याचा भूमिका आहे, असे ते म्हणाले.
तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी महामंडळाच्या माध्यमातून व्याज परताव्याच्या स्कीममधून कर्ज देत आहोत, अशी माहितीही अतुल सावे यांनी यावेळी दिली.
यासोबतच ओबीसी समाजासाठी १० लाख घरे बांधण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. त्यातली पहिल्या वर्षी ३ लाख, दुसऱ्या वर्षी ३ साख आणि तिसऱ्या वर्षी ४ लाख अशी तीन वर्षात १० लाख घरे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी क्षमता वाढवत आहोत. तसेच धनगर समाजाचा घरकुल योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी मधून कुठल्याही समाजाला आरक्षण देणार नाही ही सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.