मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत विधिमंडळाच्या वतीने दोन्ही गटांना वेळापत्रकाबाबत सूचित करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आमदार अपात्रता प्रकरणावर युक्तिवाद केला जाईल, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
२३ नोव्हेंबरच्या सुनावणीनंतर पुढील दोन आठवड्यात अपात्रता प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाकडून अपात्रता प्रकरणावर दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
तर, सर्व याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी याबाबतीतला निर्णय राखून ठेवला होता. येत्या १३ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार अपात्रतेवर सुनावणी कशी होणार?
- १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार
- १३ तारखेला सर्व याचिका एकत्र करायचा की नाही यावर सुनावणी पार पडेल
- दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करेल
- २० ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाईल
- २७ ऑक्टोबरला दोन्ही गट आपापले म्हणणे मांडतील
- ६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपापली मुद्देसुद मांडणी करतील आणि दावे प्रतिदावे करतील
- १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी होईल
- २० नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाईल
- २३ नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल
- सर्व पुरावे तपासल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडेल