मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या सगळ्यावर आता काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, मी काल पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. आमची पहिली चिंता कॅनडामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. तेथे सुमारे सात लाख लोक आहेत. त्यापैकी सुमारे पाच लाख पंजाबमधील आहेत. काही जमीन विकून तर काही कर्ज घेऊन तिथे गेले आहेत. तणावामुळे त्यांच्या व्हिसाच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये.
तसेच जस्टिन ट्रुडो यांच्याविषयी बोलताना रवनीत सिंह बिट्टू म्हणाले की, जस्टिन ट्रुडो यांच्या खटारा विमानाने येथे उड्डाण भरले नाही. ते येथे ३६ तास थांबले होते आणि आता तिकडे जाऊन अशा गोष्टी करत आहेत. रवनीत सिंह बिट्टू यांनी हरदीप सिंग निज्जरवरही निशाणा साधला.
ते म्हणाले की, हरदीप सिंग निज्जर हा माझ्या आजोबांचा खून करणाऱ्या जगतार सिंग हवारा याचा उजवा हात होता. १९९३ मध्ये निज्जर भारतातून कॅनडाला गेला आणि तिथे त्याला नागरिकत्व मिळाले. निज्जर हा १० मोस्ट वॉन्टेड गुंड आणि ड्रग पेडलरपैकी एक होता. पुढे ते म्हणाले की, जसे पाकिस्तान पूर्वी करत असे. तसेच आता कॅनडाही करत आहे. खलिस्तान्यांसाठी पाकिस्तान आणि कॅनडा सारखेच आहे असेही त्यांनी म्हटले आहे.