नवी दिल्ली: पाकिस्तानचे बेजबाबदार अणू धोरण पुन्हा एकदा उघड झाले असून मित्रदेशाच्या भूमीवरून त्याचा उच्चार होणे हे दुर्दैव आहे, अशा शब्दात भारताने पाक आणि अमेरिकेस सुनावले आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना केलेल्या विधानांवर भारताने सोमवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अण्वस्त्रांचा धाक दाखवणे हे पाकिस्तानचे जुने धोरण आहे. अशा बेजबाबदार विधानांमधून पाकिस्तानच्या अण्वस्त्र नियंत्रण व्यवस्थेवरील शंका अधिकच दृढ होतात. जेथे लष्कर दहशतवादी गटांसोबत हातमिळवणी करते, अशा देशातील अण्वस्त्र नियंत्रणावर आंतरराष्ट्रीय समुदायाने आपले निष्कर्ष काढावेत; अशी सूचना भारताने जागतिक समुदायास केली आहे.
अशा प्रकारची विधाने एका मित्रदेशाच्या देशाच्या भूमीवरून करण्यात आली, ही बाबही दुर्दैवी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत अण्वस्त्रांच्या धाकाला बळी पडणार नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत राहील, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पाकचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी पुन्हा भारताविरुद्ध वक्तव्ये केली आहेत. भविष्यातील संघर्षात पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्यास, तो अणुयुद्ध उभे करून जगातील जवळपास अर्धा भाग उद्ध्वस्त करू शकतो, अशी वल्गना मुनीर यांनी केली आहे.