चंद्रपूर : शुक्रवारी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (एस.एन.डी.टी.) ५० एकर जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध व्हावी याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यामुळे आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे बोलले जात आहे.
१० जून २०२३ रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या माध्यमातून नेताजी सुभाषचंद्र बोस डिजीटल मुलींची शाळा, बल्लारपूर येथे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे लोकार्पण करण्यात आले होते.
सन १९१६ मध्ये एस.एन.डी.टी. विद्यापीठाची स्थापना झाली असून पहिले कॅम्पस पुणे येथे सुरू झाले. पुढे मुंबई, श्रीवर्धन व चंद्रपूर या शहरांमध्ये ज्ञानसंकुल सुरू करण्यात आले. आता एस.एन.डी.टी. विद्यापीठाला मौजा विसापूर, ता. बल्लारपूर येथील सर्वे क्रमांक ४६६ मधील महापारेषण कंपनीच्या ताब्यातील भुसंपादीत जमिनीपैकी ५० एकर भुसंपादीत जमीन प्रदान करण्यात आली आहे.
या ५० एकर जागेमध्ये ५६० कोटी रुपये खर्च करून बल्लारपूर-विसापूर मार्गावर सर्व महिलांना गौरव वाटेल, असे विद्यापीठ तयार करण्यात येणार आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळातील कार्यालयात शासन निर्णयाची प्रत राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपवली. याबद्दल मुनगंटीवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.