मुंबई : अनेक मराठी कलाकार राजकीय पक्षात प्रवेश करताना गेले काही दिवस दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीत काही महिन्यांपुर्वी प्रवेश केलेल्या अभिनेत्री मेघा धाडेवर एका महत्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महाराष्ट्र भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजकपदी अभिनेत्री मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आली आहे. मेघाने जून महिन्यात भाजपामध्ये प्रवेश करून राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
याबद्दल मेघाने समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले. मला प्रिया ताईंनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार….”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अभिनेता आभिजीत केळकर, अभिनेता सौरभ गोखले यांनी भाजपात प्रवेश केला होता. तसेच जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके या कलाकारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करत शिव चित्रपट सेनेची स्थापना केली होती.