महिला समृद्धीतच जगाची समृद्धी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02-Aug-2023
Total Views | 49
नवी दिल्ली : महिलांच्या नेतृत्वाखालील विकासात्मक दृष्टीकोन स्वीकारणे हा महिलांना सक्षम करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. महिला सक्षम झाल्या तर जगही सक्षम होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० महिला सक्षमीकरण मंत्रिस्तरीय बैठकीत केले आहे.
जेव्हा महिला समृध्द होतात तेव्हा जग समृध्द होते. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यातून जागतिक प्रगतीला चालना मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांच्या नेतृत्वाखाली समावेशकतेची जोपासना होते आणि त्यांची मते सकारात्मक बदलांना प्रेरणा देतात. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासात्मक दृष्टीकोन स्वीकारणे हा महिलांना सक्षम करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे आणि या दिशेने भारत मोठी भरारी घेत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतात २०१४ पासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तांत्रिक शिक्षण घेणार्या महिलांची संख्या दुप्पट झाली असल्याचे पंतप्रधानानी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतातील एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) पदवीधरांपैकी सुमारे ४३ टक्के महिला आहेत तर अंतराळ वैज्ञानिकांपैकी सुमारे एक चतुर्थांश महिला आहेत. चांद्रयान, गगनयान आणि मिशन मंगळ सारख्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांच्या यशात महिला वैज्ञानिकांची गुणवत्ता आणि कठोर परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. भारतात उच्च शिक्षणासाठी पुरुषांपेक्षा मोठ्या संख्येने महिला प्रवेश घेत आहेत. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात महिला वैमानिकांची सर्वाधिक टक्केवारी असलेल्या देशांपैकी भारत एक आहे, भारतीय हवाई दलातील महिला वैमानिक देखील लढाऊ विमानांचे सारथ्य करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या सर्व सशस्त्र दलांमध्ये परिचालन कार्यात तसेच लढाऊ मंचावर महिला अधिकारी तैनात केल्या जात असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.