
मुंबई : ओडिशात गो-तस्करीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे येथील जनतेत तीव्र संताप निर्माण झाला असून कायदा-सुव्यवस्थेवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मयूरभंज जिल्ह्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या मोठ्या गुरांची तस्करी प्रकरणानंतर, केओन्झार आणि भद्रक जिल्ह्यांत नव्या घटना उघडकीस आल्या आहेत. मयूरभंज येथील घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत केओन्झार आणि भद्रकमध्ये गुरांच्या तस्करीचे प्रकरण समोर आले.
केओन्झार जिल्ह्यातील आनंदपूरजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २० वर धकोठा गावाजवळ एका वाहनाचा अपघात झाल्याने ही तस्करी उघडकीस आली. यावेळी स्थानिकांना कंटेनरमधून विचित्र आवाज येऊ लागले, तेव्हा त्यांनी मागील दार उघडले असता सुमारे ५० गुरे अत्यंत अमानुष स्थितीत कोंबून ठेवलेल्याचे निदर्शनास आले. त्यातील अनेक जनावरांचे पाय मोडलेले होते, तर काहींची प्रकृती गंभीर होती. गावकऱ्यांनी तत्काळ घासीपूरा पोलीस स्थानकाला माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, वाहन जप्त केले आणि चालकाला अटक केली. जखमी गुरांना नजीकच्या गोशाळेत वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले.
त्याचबरोबर भद्रक जिल्ह्यात, स्थानिक गो-रक्षकांच्या सतर्कतेमुळे गो तस्करीचा प्रयत्न उधळण्यात यश आले आहे. गो रक्षकांनी एका चारचाकी वाहनास पाठलाग करून थांबवले, ज्यात गुरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा संशय होता. भद्रक ग्रामीण पोलीस स्थानकाला याबाबत माहिती देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहन ताब्यात घेतले आणि १२ गायींची सुटका केली.
दोन दिवसांपूर्वी मयूरभंज जिल्ह्यात गो तस्करीचे प्रकरण उघडकीस आले होते. १० पिकअप व्हॅनमध्ये गुरे भरून पश्चिम बंगालकडे नेली जात होती. वनविभागाचे वाहन दिसताच तस्कर घाबरले आणि नऊ वाहने पळवण्यात यशस्वी झाले. मात्र, एक वाहन नियंत्रण गमावून एका स्थानिकाच्या घरावर आदळले. स्थानिकांच्या तत्परतेने ९ जनावरांची सुटका करण्यात आली.