नवी दिल्ली, घुसखोरांची मतपेढी वाचवण्यासाठीच बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणास (एसआयआर) काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) विरोध करत आहे, असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी बिहारमधील सीतामढी येथे जाहिर सभेत केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सीतामढी जिल्ह्यातील सीता जन्मस्थळी पुनौरा धाम मंदिराची पायाभरणी केली. त्याला माँ जानकी मंदिर असे नाव देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार देखील उपस्थित होते. हे मंदिर २०२८ मध्ये बांधून पूर्ण होईल.
यावेळी जाहिर सभेत केंद्रीय गृहमंत्र्यांनी काँग्रेस आणि राजदवर टिका केली. ते म्हणाले, बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी मतदार यादीत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातून बेकायदेशीर घुसखोरांची नावे वगळली जातील. परंतु विरोधकांना त्याचा त्रास होतो आहे, कारण हेच घुसखोर त्यांच्या मतपेढीचा भाग आहेत. राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव एसआयआरला विरोध करून बिहारच्या जनतेच्या हक्कावर घाला घालणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना वाचवू इच्छित आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केवळ संविधान हाती घेऊन फिरण्यापेक्षा ते वाचावे, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, भारतात जन्म झाला नसलेल्यांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळे अशा घुसखोरांची नावे मतदार यादीतून काढणे हे योग्य आहे की नाही, याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यायला हवे. त्याचप्रमाणे प्रक्रियेची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झाली होती. यापूर्वी २००३ मध्येही हे झाले होत. त्यामुळे विरोधक पुढे होणाऱ्या पराभवाची केवळ कारणे शोधत आहेत, असाही टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला.