भारतीय खासगी अंतराळ मोहिमेला नवे पंख; विक्रम-१ रॉकेटसाठी ‘कलाम १२००’ची यशस्वी चाचणी

    09-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली, स्कायरूट एरोस्पेसने आपल्या विक्रम-१ प्रक्षेपण वाहनाच्या पहिल्या टप्प्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्तिशाली ‘कलाम १२००’ घन इंधन रॉकेट मोटरची पहिली स्थिर चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे.

ही चाचणी शुक्रवारी सकाळी ९:०५ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र (एसडीएससी), श्रीहरिकोटा येथील स्टॅटिक टेस्ट कॉम्प्लेक्समध्ये घेण्यात आली. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या विक्रम-१ विकसित करण्याच्या प्रक्रियेतला हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे इस्रोने स्पष्ट केले.

इस्रोच्या माहितीनुसार, कलाम १२०० मोटर ही ११ मीटर लांब, १.७ मीटर व्यासाची मोनोलिथिक कंपोझिट मोटर असून, त्यात ३० टन घन इंधन आहे. श्रीहरिकोटा येथील सॉलिड प्रोपेलंट प्लँटमध्ये तयार झालेली ही आतापर्यंतची सर्वात लांब मोनोलिथिक मोटर आहे. या चाचणीसाठी विशेष चाचणी स्टँडही इस्रोनेच डिझाइन केला आहे.

भारत सरकारच्या ‘अंतराळ धोरण २०२३’च्या अनुषंगाने, खाजगी कंपन्यांना इस्रोची तांत्रिक सुविधा आणि तज्ज्ञता वापरण्याची संधी देऊन देशाच्या अंतराळ अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाला ही कामगिरी पूरक असल्याचे इस्रोने नमूद केले.