मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा ओएमजी २ चित्रपट ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित झाला. याच दिवशी गदर २ हा चित्रपटही प्रदर्शित झाल्यामुळे ओएमजी २ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होईल असे म्हटले जात होते. आणि झालेही तेच. परंतु, ओएमजी २ या चित्रपटाने ज्या संकटांचा सामना केला, प्रेक्षकांच्या विरोधाचा सामना केला त्या चित्रपटाने अनपेक्षितपणे बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ४३.११ कोटींची कमाई केली आहे.
ओएमजी २ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १०.२६ कोटी, दुसऱ्या दिवशी १५.३० कोटी आणि तिसऱ्या दिवशी १७.५५ कोटींची कमाई करत तीन दिवसांत ४३.११ कोटींचा गल्ला जमा केला आहे. लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अतिशय सोप्या पद्धतिने या चित्रपटात सांगण्यात आले आहे. या चित्रपटात कॉमेडी आणि संदेश दोन्ही गोष्टी तुम्हाला पहायला मिळतील. अनेक कलाकारांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
अभिनेते परेश रावल आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 'ओएमजी' हा चित्रपट २०१२ रोजी प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. 'ओएमजी' चित्रपटाच्या पहिल्या भागात परेश रावल हे नास्तिक दाखवले होते आणि अक्षय कुमार मानवरुपी श्री कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. आता 'ओएमजी २' मध्ये शंकराच्या रुपात अक्षय कुमार दिसला. अमित राय यांनी ' ओएमजी २' चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि अरुण गोविल यांच्याही भूमिका आहेत.