पुण्यातील बाणेर रस्ता पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग
12-Aug-2023
Total Views |
पुणे : पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील बाणेर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू करण्यात येत असल्याने आजपासून बाणेर रस्ता बंद करण्यात आला आहे.
पुण्यात शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे. यासोबतच आता हॉटेल ग्रीन पार्क चौक ते पल्लोड फार्म पर्यंतच्या रस्त्याचे तसेच मेट्रो लाईनचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस बाणेर रस्ता पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरम्यान, पुणेकरांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बाणेरकडे जाण्यासाठी हे असतील पर्यायी मार्ग
पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी अभिमान श्री जंक्शन येथून बाणेर फाटा चौकामधून उजवीकडे वळावे. त्यानंतर ‘आयटीआय’ रस्त्यावरून परिहार चौक, डावीकडे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे, नागरस रस्त्यावरून महाबळेश्वर हॉटेलजवळ बाणेर रस्त्यावर जावे लागेल. तसेच वाहनचालकांना ग्रीन पार्क हॉटेल चौकामधून डावीकडे वळण घेऊन सोमेश्वर मंदिरमार्गे राम नदीवरील पुलानंतर उजवीकडे वळण घेऊन पासपोर्ट कार्यालयासमोरून बाणेर रस्त्यावर येता येईल.
यासोबतच पीएमपी बसेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पाच मार्गावरील बसेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यावेळी बस बाणेरकडे जाताना बाणेरफाटा चौकातून उजवीकडे वळून सर्जा हॉटेल, औंध आयटीआय, परिहार चौकातून पुढे डावीकडे वळण घेऊन डीपी रस्त्याने आंबेडकर चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मिडी पॉइंट हॉस्पिटलपासून डावीकडे वळण घेऊन लिंक रस्त्याने ताम्हाणे चौकातून डावीकडे वळण घेऊन कपिल मल्हार चौकातून बाणेर बस थांब्यावर येतील. त्यानंतर पुढे पूर्ववत मार्गाने बसचे संचलन सुरू राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.