'बाईपण भारी देवा' हा चित्रपट फक्त बायकांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा!
11-Aug-2023
Total Views | 53
मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इतकेच नव्हे तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही या चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले आहे. सामान्य माणसांसह नेते आणि पोलिस यांनाही या चित्रपटाने भारावून टाकले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया एका व्हिडिओच्या माध्यमाने शेअर केली असून यात त्यांनी हा चित्रपट बायकांसह पुरुषांनीही पाहायला हवा असे आवाहन केले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले की, “स्त्रिया चित्रपट बघतच आहेत परंतु पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा आहे. आपल्या माता, भगिनी कोणत्या कोणत्या परिस्थितीतून जातात ते समजण्याची ही गरज आहे. चित्रपट पाहिल्यावर महिला स्वतःला रिलेट तर करतातच, परंतू पुरुषांनीही आपल्या रोजच्या जीवनात जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या काढून टाकणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बाईपणच्या कथानकाचं खरं यश हे आहे.”
जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे आहेत. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाने, इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे हे नक्की.