मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरुन टीका केली आहे. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करून एकप्रकारे पाकिस्तानलाच मदत केली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
"कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी वृत्तपत्रात आली आहे." असं आशिष शेलार म्हणाले.
"गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले? प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली." असा आरोपच शेलार यांनी केला.