मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. आमदार प्रसाद लाड यांनी मिठी नदीच्या गाळ प्रकरणी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. साल 2005 पासून साल 2023 पर्यंत नदीचा सौंदर्यायासाठी किती खर्च झाला तसेच गाळ काढण्यावर किती खर्च झाला याबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे सामंत म्हणाले.
शिवाय यावेळी बोलताना त्यांनी उद्योग राज्याबाहेर गेल्याबाबत अधिवेशनात श्वेतपत्रिका येणार असल्याचीही महत्त्वाची माहिती दिली. उद्योग मंत्री उदय सामंत हे श्वेतपत्रिका सादर करणार आहेत. वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले, याबाबतची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे. विधान परिषदेत उपस्थित प्रश्नाला उद्योग खात्याचे लेखी उत्तर आले आहे. विद्यमान सरकारमुळे वेदांता, टाचा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.