मुंबईत कोसळधारा! जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना!
19-Jul-2023
Total Views | 51
मुंबई: राज्यात अतिमुसळधार पावसाने थैमान घातले असताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा शिंदेंनी घेतला असून कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, "आज मुंबई आणि परिसरात खूप पाऊस झाला आहे. यामुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून एनडीआरएफ तसेच जिल्हा प्रशासनाना निर्देश देण्यात आले आहेत. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत."
"हवामान खात्यानं अॅलर्ट जारी केले आहेत त्यानुसार, आवश्यक त्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये व सुरक्षितस्थळी राहावे. तसेच मुंबई व परिसरातील शाळा-कॉलेजला लवकर सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्यात आलं आहे." अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.