सिंहगडच्या जंगलात दिसला बिबट्या; मोरदरवाडीतील ग्रामस्थांमध्ये घबराट
18-Jul-2023
Total Views | 44
पुणे : सिंहगड किल्ला घेरा परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचे दिसून आला. बिबट्या दिसल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. सिंहगडाच्या जंगलातील मोरदरवाडी भागामधील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भांबुर्डावन विभाग आणि घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीच्या पथकाने मोरदरवाडी भागास भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी देखील शिवगंगा खोर्यातील घेरा सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता. मोरदरवाडीतील साहेबराव यादव यांच्या बंगल्याच्या परिसरामध्ये हा बिबट्या दिसून आला. घरातील लहान मुलांनी आपल्या मोबाइलवरुन बिबट्याचे चित्रीकरण करुन त्याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वन विभागास दिली आहे. आमदार भीमराव तापकीर यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क साधला असून याबाबत उपाययोजना कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.