पुणे : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात राहून त्यांच्या इशार्यावरुन भारतातील काहीजणांना पैसे पुरविल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने पुण्यामधून सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. भुवनेश्वर न्यायालयाने बजावलेल्या अजामिनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करीत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, अभिजीत संजय जांभुरे (रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित याने गुजरात येथील आणंदमध्ये असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल विश्वविद्यालयामधून स्टॅटीस्टीक्स विषयात पोस्ट ग्रॅज्यूएशन केले आहे. मागील काही वर्षांपासून तो पुण्यातील हिंजवडी परीसरात असलेल्या विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करीत होता.
तो २०१९पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे समोर आले होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांनाही याबाबत माहिती मिळाली होती. ओडिशा पोलिसांना एका प्रकरणाच्या तपासात अभिजित याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानच्या दोन गुप्तहेर संस्थांच्या सातत्याने संपर्कात होता. दरम्यान, २०१८मध्ये त्याची दानिश तथा सय्यद दानिश अली नकवी याच्याशी फेसबुक मेसेंजरद्वारे ओळख झाली. दानिश हा पाकिस्तानतील फैसलाबाद येथील राहणार आहे. त्याने चेग्ग या अमेरिकन एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये फ्रीलान्सर म्हणून काम करीत असल्याचे त्याला सांगितले. अभिजीतने त्याचा यूजर आयडी आणि पासवर्ड दानिशला दिला. दानिश त्या आयडीवरून चेग्गमध्ये काम करत होता.
दानिशने त्याची ओळख खुर्रम तथा अब्दुल हमीद या कराचीमधील व्यक्तीसोबत करून दिली. खुर्रम हा पाकिस्तान आर्मी इंटेलिजन्समध्ये वरिष्ठ अधिकारी होता. त्याचे भारतात गुप्तहेर जाळे असल्याचे तपासात पुढे आले आहे. खुर्रमच्या सांगण्यावरून अभिजीतने त्याच्याकडील पैसे अनेकदा भारतातील पाकिस्तानी इंटेलिजंन्स ऑपरेटीव्ह (पीआयओ) अर्थात भारतात गुप्तहेर म्हणून काम करणार्या लोकांना पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.